बेस्टची नवीन लढाई शुक्रवारपासून

बेस्टची नवीन लढाई शुक्रवारपासून

Best Bus

आर्थिक खाईत गेलेल्या बेस्ट उपक्रमाकडे आपल्याच कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी प्रशासनाकडे पैसे नसल्याचे कारण देत, बेस्ट प्रशासन आता फेब्रुवारी महिन्याचे वेतन आता 30 मार्च रोजी देणार आहे. यासंबंधी कोर्टानेही परवानगी दिल्यामुळे बेस्ट कर्मचारी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आता शुक्रवारपासून बेस्ट आणि मुंबई महापालिकाविरोधात शुक्रवारपासून पुन्हा नवीन लढाई सुरू करणार आहे.

बेस्ट कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. फेब्रुवारी महिन्याचा पगार लांबल्याने कर्मचारी आता संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरे जावे लागणार की काय? असा मोठा प्रश्न आता मुंबईकरांसमोर निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यातदेखील बेस्ट कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले होते. त्यावेळी जवळपास आठवडाभर हा संप चालला होता. पण, आता पुन्हा एकदा दोन महिन्यानंतर बेस्ट कर्मचारी आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत. मात्र या वेळी आंदोलनाचे स्वरूप अद्यापही समजले नाही. बेस्ट कामगार संघटना आणि बेस्ट वर्कर्स युनियन आता शुक्रवारपासून जनतेत जाणार आहे.

सत्ताधारी पक्ष बेस्टला संपविण्याचा कसा घाट रचत आहे. याचे पत्रक जनतेला देणार आहे. सोबतच बेस्ट आणि बीएमसी विरोधात साक्षरी मोहीम सुद्धा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायण कहार यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे. सोबतच बेस्ट प्रशासन आणि महानगर पालिका बेस्ट उपक्रमाला खासगीकरण करण्याचा घाट रचत आहे. त्यामुळे आम्ही हा घाट रचू देणार नाही. या विरोधात पाहिजे ते आंदोलन करू, असा इशारा बेस्ट कामगार संघटनाकडून देण्यात येत आहे.

बेस्ट कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

बेस्ट प्रशासनाला गेल्या काही दिवसांपासून आर्थिक घरघर लागलेली आहे. कर्मचार्‍यांचे महिन्याचे पगार देण्यासाठी बेस्टला गेल्या दोन वर्षांपासून विविध बँकांचे दर महिन्याला कर्ज घ्यावे लागत आहे. परिणामी कर्मचार्‍यांना पगार महिन्याच्या १० तारखेनंतरच मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून तर पगारासाठी महिन्याची १५ तारीख उलटून जात आहे. त्यामुळे कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा असा मोठा प्रश्न कर्मचार्‍यांना सतावत आहे. बेस्ट कर्मचारी मनपा आणि बेस्ट प्रशासनाविरोधात आंदोलनाच्या तयारीत आहे.

First Published on: March 22, 2019 4:23 AM
Exit mobile version