आंग्रीया क्रूझला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

आंग्रीया क्रूझला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

Angriya Cruz

देशातील पर्यटनाला नवा आयाम देणारी बहुचर्चित ‘आंग्रीया’ या देशातील पहिल्यावहिल्या आंतरदेशीय क्रूझ सेवेला पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ‘आंग्रीया’ क्रूझमधून जवळपास ६ हजार ६५० पर्यटकांनी प्रवास केला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आंग्रीया क्रूझ मोलाची भूमिका बजावत आहे. आंग्रीया क्रूझ सुरु होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण होत आहे. या आलिशान आंग्रीया क्रूझच्या मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई या मार्गावर आतापर्यंत ६ हजार ६५० इतक्या पर्यटकांनी या आलिशान आंग्रीया क्रूझमधून प्रवास केला आहे. आतापर्यंत आंग्रीया क्रूझमधून एकूण १९ फेर्‍या झाल्या आहेत. आंग्रीया क्रूझला पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आंग्रीया क्रूझच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

खासगी क्रूझ कंपनीच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरु केली आहे. एक दिवस आड ही सेवा सध्या सुरु आहे. मुंबईहून रोज संध्याकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहचते. क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट्स, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असे बरेच काही आहे. आंग्रीया क्रूझवर १०४ खोल्या असून सुमारे ३५० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास करता येतो. यासाठी सहा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान प्रवास तिकीट आहे. चार ते चौदा व्यक्तींच्या कुटुंबासह जोडप्यांसाठी खास खोल्यांची सुविधा क्रूझमध्ये करण्यात आली आहे. या खोल्या सर्व सुखसोयींनी सज्ज आहेत. त्यामुळे पर्यटक आंग्रीया क्रूझला चांगलीच पसंती देत आहेत.

मुंबई-गोवा फेरी बोटसाठी हा पहिलाच प्रयत्न नाही. तर यापूर्वी देखील कोकण किनारपट्टीवर साठ-सत्तरच्या दशकात पणजी ते मुंबई फेरी बोट सेवा चालायची. रस्ते आणि हवाई मार्गाऐवजी जलमार्गाला तेव्हा अधिक प्राधान्य दिले जात होते. १९८० पर्यंत चालणारी ही सेवा नंतर बंद झाली. दमानिया शिपिंगने १९९४ साली मुंबई ते गोवा दरम्यान फेरी बोट सेवा सुरू केली. या बोटीने त्याकाळी मुंबईहून गोव्याला जायला सात तास लागत होते. पण २००४ पासून ही सेवाही बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा ‘आंग्रीया सी ईगल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहाय्याने ही सेवा सुरु केली आहे. त्याला आता पर्यटकांकडून पुन्हा प्रतिसाद मिळत आहेत.

मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई अशा सागरी प्रवासासाठी आंग्रीया क्रूझ सेवा सुरु केली आहे. या आंग्रीया क्रूझ सेवेला मुंबई आणि गोवातील पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहेत. महाराष्ट्र आणि गोवातील पर्यटकांना चालना देण्यासाठी आंग्रीया क्रुझ भविष्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
– सिद्धार्थ नवलकर, कार्यकारी संचालक, आंग्रीया क्रूझ

First Published on: November 21, 2018 5:40 AM
Exit mobile version