Best Strike : मनसे मुंबईत ‘तमाशा’ करणार

Best Strike : मनसे मुंबईत ‘तमाशा’ करणार

मनसे मुंबईत 'तमाशा' करणार

गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. या संपाबाबत राज्य सरकारची भूमिकाही अधांतरीच असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आज न्यायालयातही सुनावणी होणार आहे. पण संपावर आज जर तोडगा निघाला नाही तर ‘तमाशा’ करणार, असा इशारा मनसेने दिला आहे. जर या संपात मनसेने उडी घेतली तर हा संप अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संप चिघळण्याची शक्यता

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बेस्ट कामगारांची भेट घेतली होती. कृष्णकुंजवर जाऊन बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आपला मुद्दा मांडला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना ‘एकजुटीने रहा’ असा सल्ला देखील दिला होता. तसेच ‘माझ्याकडे आलात म्हणजे तुमचा प्रश्न सुटणार’ असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिला होता. तसेच आता आम्ही आमच्या पद्धतीने समस्या सोडवू, असे आश्वासन देखील यावेळी राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलं होतं. त्याप्रमाणे आज जर बेस्ट संपावर तोडगा निघाला नाही तर मनसे प्रत्यक्ष संपात उतरणार आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर जो काही तमाशा होईल यासाठी प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. यामुळे बेस्ट संप आणखी चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे.

संपामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांकडून लूट

संपामुळे मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आहे तो रिक्षा, टॅक्सी चालकांनी. रिक्षा, चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांकडून लूट होत असल्याने मुंबईकरांना पायपीट करावी लागत आहे. यामुळे मुंबईकरांना वेठीस धरले जात आहे.


पाहा – काय म्हणाले राज ठाकरे बेस्ट कर्मचाऱ्यांना!

First Published on: January 14, 2019 10:24 AM
Exit mobile version