१२ वर्ष सेवा देणार्‍या BEST कमचार्‍यांना कालबद्ध बढती द्या, कर्मचाऱ्यांची मागणी

१२ वर्ष सेवा देणार्‍या BEST कमचार्‍यांना कालबद्ध बढती द्या, कर्मचाऱ्यांची मागणी

बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सल्लागार नेमणार

तब्बल १२ वर्षे अखंड सेवा करुनही कालबद्ध पद्धतीने अद्यापही बढती न मिळाल्याने बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांना बढती देण्यात यावी, तसेच २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना उपक्रमातील त्या पदांवर नियुक्त करुन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन बेस्टमधील कर्मचार्‍यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रविण शिंदे यांना दिले आहे. बेस्टमध्ये १२ वर्षे एकाच पदावर काम करणार्‍या सेवक वर्गास कालबद्ध पदोन्नती दिली जाते. या धोरणात काही बदल अपेक्षित आहेत. त्याचा लाभ कर्मचार्‍यांना नियम व अटींच्या आधीन राहून देण्यात यावा, अशी सूचनाही कर्मचार्‍यांनी आपल्या निवेदनात केली आहे. यात बेस्ट उपक्रमाच्या २५.९.२००९ च्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक ५ नुसार ज्या कर्मचार्‍यांना एक नियमित बढती मिळालेली आहे, अशा कर्मचार्‍यांना बढतीच्या श्रेणीमध्ये १२ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला या योजनेचा लाभ संपूर्ण सेवेत एक वेळा अनुज्ञेय राहील, असे नमूद करण्यात आले आहे.

बेस्ट उपक्रमात कर्मचारी जर परीक्षा देऊन बढतीस पात्र ठरत असेल तर त्याला त्याच पदावर कालबाह्य एकच पदोन्नती देणे ही नियमानुसार आहे. असे असेल तर जे कर्मचारी १२ वर्षे एकाच पदावर काम करीत असल्यास त्यास त्याच्या संपूर्ण सेवा कालावधीत किमान दोन कालबाह्य पदोन्नती देणे अपेक्षित आहे, असे ही कर्मचार्‍यांनी निवेदनात नमूद केले आहे. परंतु बऱ्याच वेळा निवृत्तीच्या काही दिवस अगोदरही कर्मचार्‍यांना बढती देण्यात आली आहे. ही बाब स्तुत्य असेली तरी संपूर्ण सेवा कालावधीत १२ वर्षानंतर लागू होणार्‍या कालबद्ध पदोन्नती किमान दोनदा तरी मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने विचार करुन त्याप्रमाणे पदे निर्माण करुन त्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती बेस्टचे कर्मचारी अनिल म्हसकर व पर्यवेक्षक विभागाचे सह कर्मचारी यांनी बेस्टचे अध्यक्ष प्रविण शिंदे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ऑक्टोबर २००९ नंतर पुढील दुसरी कालबद्ध पदोन्नती ऑक्टोबर २०२१ मध्ये अनुज्ञेय होणार असल्याने त्याचा विचार करावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

First Published on: November 23, 2020 5:31 PM
Exit mobile version