आता दंडात्मक कारवाई नाही थेट गुन्हा दाखल

आता दंडात्मक कारवाई नाही थेट गुन्हा दाखल

नवी मुंबई : दंडात्मक कारवाई करूनसुद्धा वाहन चालक सुधारत नसल्यामुळे आता नियम तोडणार्‍या वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण ३३ दुचाकी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर थेट भादवि कलम २७९ नुसार गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी पुणे पोलिसांनी वाहतुकीचे नियम तोडणार्‍या वाहनचालकांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती. त्यापाठोपाठ नवी मुंबई पोलिसांनीही गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. बेदरकार वाहन चालविणार्‍यांवर, विरुद्ध दिशेने अथवा फूटपाथवरून वाहन चालविणार्‍या वाहनचालकांवर पूर्वी मोटर वाहन कायद्यानुसार वाहतूक पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.

दंडात्मक कारवाई झालेले हे वाहनचालक किरकोळ दंड भरून पुन्हा बेदरकारपणे वाहन चालविण्यासाठी मोकळे होत होते. वाहनचालकांच्या अशा वृत्तीमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने अशा वाहनचालकांवर जरब बसावी, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर थेट भादवि कलम २७९ नुसार गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी वाहनचालकांविरोधात न्यायालयात पोलिसांकडून रितसर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून त्यांना सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली जाण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांकडून गुन्हे दाखल होणार्‍या वाहनचालकांना पासपोर्ट पडताळणीसाठी अडचण येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोकरीसाठी आवश्यक असलेल्या पोलीस पडताळणीसाठीही अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करता, सुरक्षित वाहन चालविण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिसांकडून अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्यास वाहनचालकांमध्ये भीती निर्माण होऊन आपसूक त्यांच्याकडून वाहतुकीचे नियम पाळले जातील. आतापर्यंत दंडात्मक कारवाया केल्या तरी त्यांच्यावर जरब बसत नसल्याने अखेर असा पर्याय शोधावा लागला.
-अरुण पाटील – सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा

First Published on: September 22, 2018 3:01 AM
Exit mobile version