भारिपकडून उमेदवार निवडीमध्ये चूक, प्रकाश आंबेडकरांची कबुली

भारिपकडून उमेदवार निवडीमध्ये चूक, प्रकाश आंबेडकरांची कबुली

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

ईशान्य मुंबईतून आमच्याकडून चुकीचा उमेदवार निवडला गेला ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातून ज्या उमेदवारांची नावे सुचवली जातील त्यांना संधी दिली जाईल असे आम्ही ठरवले आहे. आमच्या जिल्हा कमिटीकडून चूक झाली असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातून संभाजी काशीद या उमेदवाराच्या नावाची घोषणा त्यांनी केली. मात्र, त्यानंतरच या उमेदवाराला बदलण्याची मागणी केली जाऊ लागली होती. भारिपच्याच काही कार्यकर्त्यांनी तर उमेदवार बदलण्यासाठी थेट प्रकाश आंबेडकरांना पत्रच लिहिले होते. अखेर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवार निवडीमध्ये चूक झाली असल्याचे आंबेडकरांनी कबुली दिली.

उमेदवारांची यादी केली होती जाहीर

१५ मार्च रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. काग्रेसशी चर्चा फिस्कटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ४८ जागांवर उमेदवार उभे करण्याची त्यांनी घोषणा देखील केली. उमेदवारी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईशान्य मुंबईतला उमेदवार बदलण्याची नामुष्की आघाडीवर आली होती. संभाजी काशीद या उमेदवाराचं नाव जाहीर केल्यानंतर लगेचच त्याला स्थानिक जनतेच्याही आधी भारिप बहुजन महासंघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडूनच विरोध होऊ लागला होता.

शरद पवारांवर केले आरोप

मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीचा मास्टर माइंड असल्याचा संशयीत आरोपी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याची संधी गमावली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्यास तयार असल्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.

First Published on: March 19, 2019 2:47 PM
Exit mobile version