भिवंडीचे वजनदार नेते सुरेश म्हात्रेंचा सेनेला जय महाराष्ट्र!

भिवंडीचे वजनदार नेते सुरेश म्हात्रेंचा सेनेला जय महाराष्ट्र!

सुरेश म्हात्रे

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने बाळ्या मामा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करत भिवंडी ग्रामीण भागात बाळ्या मामांनी तरुणांमध्ये चांगले स्थान मिळवले. मात्र, खासदारकीचे वेध लागल्याने मनसेत प्रवेश करीत भिवंडी लोकसभा लढवत त्यांनी चांगल्या प्रकारची मते मिळवली. पण, नंतर मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश केला. पण, तिथे कपिल पाटील यांच्यामुळे आपली राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते हे वेळीच ओळखत त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसमधून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून थेट दिल्लीत जाऊन तिकीट मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळणारच होते, परंतु ऐनवेळी माशी शिंकली आणि त्यांना तिकीट मिळू शकले नाही.

त्यांना उमेदवारी मिळू न देण्यामागे ठाणे जिल्ह्यातीलच एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात होता असे बोलले जात होते. कारण म्हात्रे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली असती तर ते निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि त्यामुळेच त्यांना सदर उमेदवारी मिळू शकली नाही आणि त्यांचे खासदारकीचे स्वप्न अधुरे राहिले.२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल दोन वर्षे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. सेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर त्यांनी शिवसेना सदस्य पदाबरोबरच आपला जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते तेव्हापासूनच बाळ्या मामा हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेससोबत घरोबा करणार असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर आगामी २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच खासदारकीसाठीच बाळ्या मामा यांनी हा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे.

First Published on: May 30, 2021 3:15 AM
Exit mobile version