भिवंडी बारचालकावर गोळीबार प्रकरण ; आरोपी गजाआड

भिवंडी बारचालकावर गोळीबार प्रकरण ; आरोपी गजाआड

हल्लेखोरांना अखेर अटक

मुंबई-नाशिक महामार्गावर राजनोली नाका येथील स्विट हार्ट ऑर्केस्ट्रा बार चालकावर २८ मे रोजी गोळीबार केलेल्या आरोपीच्या कोनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बार चालक अमोल बोराडे यांच्यावर २८ मे रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास बार परिसरात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अमोल बोराडे जखमी झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान कोनगाव पोलिसांनी दोन आरोपींना इंदौर येथून ताब्यात घेतले आहे. कपिल कमलाकर कथोरे रा. कांदळी, ता. भिवंडी व इरफान कय्युम खान रा. न्यू आझाद नगर, शांतीनगर, भिवंडी असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कपिल कमलाकर कथोरे व इरफान कय्युम खान हे स्विट हार्ट बार मध्ये २६ मे रोजी दारु पिण्यासाठी आले होते. यावेळी या दोघांचा बार चालक अमोल बोराडे सोबत वाद होऊन भांडण झाले.

तपासासाठी पोलिसांचे दोन स्वतंत्र पथक

या घटनेच्या सखोल तपासासाठी पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर व पो. नि. रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. सुर्यवंशी व पो. उप. नि. नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली पो. उप. नि. राजपुत, पो. हवालदार शिंदे, पो शिपाई देवरे, पाटील, महाले, असे पोलिसांचे दोन स्वतंत्र पथक इंदौर, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथे तपासाकामी रवाना झाले.

दोन्ही पथकाला इंदौर येथील विजयनगर सर्कल येथील चहा टपरीसमोर आरोपी वापरत असलेली ह्यून्दायी कार क्रमांक एम एच ०४ एच झेड ०९९० आढळली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कपिल कमलाकर कथोरे व इरफान कय्युम खानच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी इरफान कय्युम खानने हल्ला करण्यासाठी वापरलेली गावठी पिस्तून जप्त केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना पोलिसांना भिवंडी येथे आणून अटक केली. या दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती व. पो. नि. रमेश काटकर यांनी दिली.

कपिल कथोरेचा गांजा अफूचा व्यवसाय

बारमधील दारु पिण्यावरुन हा हल्ला झाल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. तरी या मागील दुसऱ्या कारणांचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कपिल कथोरे हा आपल्या साथीदारांसह अफू, गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असुन. कपिल याने मुळची इंदौर येथील पूजा नामक बारबालेसोबत लग्न केले आहे. अफू गांजाच्या व्यवहारातूनच कपिलची इरफान सोबत ओळख झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास या हल्ल्या मागील दुसरे कारण पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First Published on: June 3, 2019 10:33 PM
Exit mobile version