भिवंडी लोकसभेत कुणबी मतांवर उमदेवाराची मदार

भिवंडी लोकसभेत कुणबी मतांवर उमदेवाराची मदार

भिवंडी लोकसभा मतदारसंघ

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड या तीन विधानसभा मतदारसंघातील तालुक्यात सर्वाधिक मतदान हे कुणबी समाजाचे आहे. कुणबी समाजाची मते ही निर्णायक ठरणारी असल्याने या लोकसभा क्षेत्रात कुणबी कार्ड प्रभावी ठरणार हे निश्चित आहे. येथील उमेदवाराची मदार ही कुणबी मतांवर अवलंबून आहे. असे एकंदरीत चित्र भिवंडी लोकसभेचे आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील विजयी झाले होते. पाटील यांना 4 लाख 11हजार 70 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3 लाख 16 हजार 620 मते मिळाली होती तर मनसेकडून निवडणूक लढविलेले सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना 93 हजार 647 मते मिळाली होती. या लोकसभा क्षेत्रात कपिल पाटील यांची उमेदवारी भाजप पक्षाकडून निश्चित झालेली आहे. मात्र, काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर न केल्यामुळे येथील उमेदवारीचा तिढा कायम आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिल्ली दरबारी अनेक इच्छुक तळ ठोकून बसले आहेत. यात आता पुन्हा या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विश्वनाथ पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

एकूण 6 लाख मतदार कुणबी समाजाचे असल्याचा दावा त्यांनी केला असून, आपल्या कुणबी कार्डावरील मताधिक्याची गणित मांडत त्यांनी काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीचा आग्रह धरला आहे, तर याच मतदारसंघात खासदार राहिलेले सुरेश टावरे हे देखील लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसने अजून त्यांना उमेदवारी दिली नाही भाजप शिवसेनेने युती केल्याने आणि भिवंडी लोकसभा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी हुकल्यामुळे तेे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी आता काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेस पक्षाकडून लोकसभा उमेदवारीसाठी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांचे नाव उमेदवारीत आघाडीवर आहे. तसेच या लोकसभेत ज्येष्ठ कार्यकर्ते आर.सी. पाटील यांचे नावदेखील ऐकण्यास मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने कुणबी मतांचा आकडा डोळ्यासमोर ठेवून येथे कुणबी उमेदवार डि.पी सावंत यांच्या नावाची घोषणा केल्याने निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत. ही निवडणूक चुरशीची होणार असे चित्र आहे. काँग्रेस पक्षातील इच्छुकांतील या तिघापैंकी काँग्रेसकडून कोणाला तिकीट मिळेल हे मात्र अद्याप स्पष्ट नाही, परंतु या इच्छुक उमेदवारांपैकी एकाचे तिकीट कापले जाणार, हे मात्र निश्चित आहे. यातील एक इच्छुक उमेदवार पक्षाचे काम करील किंवा बंडखोरी करून निवडणूक लढविल. हे चित्र मात्र येत्या निवडणुकीत पाहण्यास मिळेल. येथे उमेदवार देताना तो भाजप शिवसेनेच्या युतीपुढे टिकला पाहिजे. याचा विचार करून येथे उमेदवारीच्या निवडीला प्राधान्य दिले जात आहे. भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड या तीन तालुक्यात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यापाठोपाठ आगरी समाजही येथे दिसतो, परंतु कुणबी मतदार मात्र सर्वाधिक आहेत येथे राजकीय पक्षापेक्षा समाजबांधव उमेदवाराला मतदारांनी अधिक पसंती दिल्याचे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत दिसून आले आहे. यामुळे कुणबी कार्डाचा विचार काँग्रेस पक्षाकडून होऊ शकतो. म्हणून अद्यापही काँग्रेसकडून उमेदवाराचे नाव घोषित केले जात नाही.

बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नावाच्या चर्चेने टावरे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली असून, नक्की उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट न झाल्याने उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काँग्रेसने भाजपाच्या कपिल पाटलांना टक्कर देणारा तगडा उमेदवार येथे दिल्यास निवडणूक ही अटीतटीची व रंगतदार होणार हे निश्चित आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत काटे की टक्कर देत कडवी झुंज देईल. यामुळे येथे विजय संपादन करणे कुठल्याच उमेवाराला सहज सोपे नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

First Published on: March 23, 2019 4:41 AM
Exit mobile version