प्रकाश आंबेडकरांकडून अजित पवारांवर मोठा आरोप; पहाटेचा शपथविधी ‘या’ कारणासाठी

प्रकाश आंबेडकरांकडून अजित पवारांवर मोठा आरोप; पहाटेचा शपथविधी ‘या’ कारणासाठी

मुंबई : अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केसेस मागे घेण्यासाठी झाला होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. केसेस मागे घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) सरकारमधून बाहेर पडले, असेही आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केले आहे.

बाजार समितीचे निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. या निकालानंतर हे बदलाचे संकेत आहेत का?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, बाजार समितीत महाविकास आघाडीची याआधीही सत्ता होती. त्यामुळे नव्याने काही आले असे मला वाटत नाही.

पहाटेच्या शपथविधीवरून त्यांना विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पहिल्यांदाच कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, केसेस मागे घेण्यासाठी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी उरकून घेतला, असे मला वाटते. आपल्या केसेस मागे घेतल्या आणि त्यानंतर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा राष्ट्रवादीमध्ये गेले असा दावा त्यांनी केला आहे.

भाजपा विरोधी पक्षांना मदत करणार
आरएसएस, भाजपा जोपर्यंत वर्चस्ववादी, लोकशाहीविरोधी आणि मनुवाद्यांची भूमिका मांडत आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात जे राजकीय पक्ष आहेत त्यांना आम्ही मदत करणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम राहणार आहे आणि एनरॉनलाही आमचा विरोध होता. एनरॉन घालवण्यामध्ये आमची भूमिका मोठी होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना येवढेच सांगेन की, कोकणाची वाट लावू नका.

केंद्रामुळे राज्याची भूमिका बदलते
केंद्रातून फोन आले की राज्य सरकारीच भूमिका बदलते, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, कोकणमध्ये 95 टक्के ऑक्सिजन तसेच प्रदूषणमुक्त परिसर असल्यामुळे त्या ठिकाणी फ्लोरा आणि फोना जन्माला येतो. तो परिसर भविष्यात तसाच राहायला हवा. मला पूर्णवेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करू शकतो, असे वक्तव्य अंतुले यांनी मुख्यमंत्री झाल्यावर केले होते. त्यांच्यात काळात गाव तिथे एसटी सुरू झाली, पण नंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेतले होते. त्यामुळे प्रकल्प आल्यामुळे कोकणमध्ये रोजंदारी वाढेल, पण त्यासाठी कोकणातील नैसर्गिक संपत्तीचे रक्षण कसे करता याचे योग्य नियोजन करून व्यापार, छोटे उद्योग सुरू केल्यास तेलंगणाप्रमाणे कोकणातही लोकांचे उत्पन्न वाढेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

First Published on: April 30, 2023 9:56 AM
Exit mobile version