रेल्वेच्या 9673 कोचमध्ये जैवशौचालय

रेल्वेच्या 9673 कोचमध्ये जैवशौचालय

मेल-एक्स्प्रेस

महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडयाचे आयोजन मध्य आणि पश्चिम रेल्वे करण्यात आले आहे.याअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सुमारे 98 टक्के मेल-एक्स्प्रेसमधील कोचमध्ये जैवशौचालये कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांसह रुळांची स्वच्छता करणार्‍या सफाई कामगारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमध्ये जैवशौचालये बसविण्यात यावीत, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने रेल्वे मंत्रालयाला दिले होते.

रेल्ेवच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील कोचमध्ये असणार्‍या सामान्य शौचालयांमुळे ती गाडी ज्या मार्गावरुन धावते.त्या मार्गावरील रेल्वे रुळांवर मानवी विष्ठा पडते. परिणामी रेल्वे रुळ खराब होतात,तसेच रुळांवर काम करणार्‍या सफाई कामगारांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. सफाई कामगारांसह सिग्नल आणि रुळांच्या जोडणीच्या कामगारांना आधी जागेची स्वच्छता करून त्यानंतरच काम करावे लागत होते. ही अडचण सोडवण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व कोचमध्ये जैवशौचालय बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

पश्चिम रेल्वेवरील 4899 रेल्वे डब्यात कोचमध्ये जैवशौचालय कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित 22 मेल-एक्स्प्रेसमध्ये ते लवकरच बसविण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. मध्य रेल्वेच्या 4684 रेल्वे कोचमध्ये जैवशौचालये उभारण्यात आली आहे. येत्या काही आठवड्यात या कोचमध्ये जैवशौचालये कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

First Published on: October 1, 2019 5:31 AM
Exit mobile version