म्हाडाचे ट्रान्झिट कॅम्पमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण

म्हाडाचे ट्रान्झिट कॅम्पमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण

MHADA BIOMETRIC SURVE

विविध संक्रमण शिबिरामधील मूळ रहिवासी व घुसखोर यांची सविस्तर माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे संकलित करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये वर्षानुवर्षे राहणार्‍या रहिवासी आणि भाडेकरू, घुसखोरांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करणार आहे. या कामाला दोन महिन्यात सुरूवात होईल अशी माहिती म्हाडाच्या अधिकार्‍यांनी दिली. सर्वेक्षणाच्या माध्यमातून अनेक वर्षे रखडलेला डेटाबेस तयार करण्यात येणार आहे.

आतापर्यंत बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या कामासाठी झोपडपट्टी सुधार मंडळ तसेच काही संस्थांकडून सादरीकरण करण्यात आले आहे. पण कामासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यानंतरच बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात होईल. इतर ठिकाणी झालेल्या सर्वेक्षणानुसार म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील सर्वेक्षण सोपे नाही. त्यामुळे ठराविक कागदपत्रांच्या आधारावरच हे सर्वेक्षण पुर्ण होऊ शकते अशी माहिती म्हाडाचे सहमुख्य अधिकारी दिनकर जगदाळे यांनी दिली. सर्वेक्षणादरम्यान कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी म्हाडाकडून विशेष सॉफ्टवेअर बनवण्यात आले आहे. म्हाडाच्या आयटी सेलकडून या सर्वेक्षणाच्या सॉफ्टव्हेअरचे काम करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन एजन्सीकडून बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी सादरीकरण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. बायोमेट्रिक सर्वेक्षणामुळे सध्याच्या म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेमके कोण राहत आहे याची माहिती मिळणे शक्य होईल. आताच्या घडीला अशी अद्ययावत माहिती म्हाडाकडे उपलब्ध नाही.

पंतप्रधान आवास योजनेसाठी फायदा
म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये राहणार्‍यांचा डेटाबेस तयार झाला की पंतप्रधान आवास योजनेसाठीचा लाभ रहिवाशांना घेता येणार आहे. आताच्या घडीला म्हाडाकडे संक्रमण शिबिरात राहणार्‍यांची कोणतीही अद्ययावत यादी नाही. त्यामुळे अशा योजनांसाठी हा डेटाबेस उपयुक्त ठरेल असे जगदाळे यांनी सांगितले.

First Published on: July 18, 2019 4:03 AM
Exit mobile version