पालघरमध्ये सरकारविरोधात भाजपची आंदोलने

पालघरमध्ये सरकारविरोधात भाजपची आंदोलने

महाआघाडी सरकार हे शेतकर्‍यांची फसवणूक करणारे फसवे सरकार आहे. या आताच्या महाआघाडी सरकारने कर्ज माफीच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकर्‍यांची फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. महाआघाडी सरकार विरोधात मंगळवारी वसई तसेच जव्हार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

भाजपाचा विश्वास घात करून, शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले. मात्र ह्या महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या कर्ज माफीची निवळ घोषणा करून, फसवणूक केली आहे. महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या प्रति हेक्टरी 25 हजार रुपये, तर फळबागसाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची घोषणा केली आहे. पालघर सरचिटणीस विठ्ठल थेतले, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर, जि. प.सदस्य सुरेखा थेतले, सभापती सुरेश कोरडा, माजी सभापती तुळशीराम मोरघा अन्य पदाधिकारी यांच्या नेतृवाखाली सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य भरात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून महाविकास आघाडी सरकारने दिलेली मदत फसवी असल्याचे सांगून विक्रमगड भाजपा पक्षाने तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन निषेध नोंदवला. स्थगिती सरकारचा धिक्कार असो, महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध असो, महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी मंगळवारी तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून गेला होता. शासनाविरोधात भाजपाने एल्गार पुकारला असून वाडा तहसीलदार कार्यालयासमोर भाजप वाडा शाखेच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी वरील घोषणा दिल्या. धरणे आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, बाबाजी काठोले, नंदकुमार पाटील, हेमंत सवरा आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

First Published on: February 26, 2020 2:42 AM
Exit mobile version