खुर्चीसाठी उद्धव यांनी आतंकवादाला खतपाणी घातले; भाजपचा गंभीर आरोप

खुर्चीसाठी उद्धव यांनी आतंकवादाला खतपाणी घातले; भाजपचा गंभीर आरोप

मुंबईः खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी राज्यात आतंकवाद फोफावण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले होते, असा दावा भाजपने शनिवारी ट्विट करुन केला. याप्रकरणात उद्धव ठाकरे हे अमरावती पोलिसांवर दबाव टाकत होते, असा आरोपही भाजपने केला आहे. या हत्येचा घटनाक्रम मांडून भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

२१ जून २०२२२ रोजी केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. रात्री १० च्या सुमारास त्यांची गळा चिरुन निघृण हत्या करण्यात आली. ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. या हत्येला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. काही दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली.  ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा दावा २१ जून ते २ जुलैपर्यंत पोलीस करत होते. भाजप व हिंदुत्त्वादी संघटनेने या हत्येविरोधात आवाज उठवला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य पोलिसांना नव्हते, असा आरोप भाजपने ट्विटमध्ये केला.

अमरावती पोलीस हे वारंवार ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे सांगत होते. पोलिसांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री यांचा दबाव होता. राजस्थानमध्ये २ जुलै २०२२ रोजी  कन्हैयालालची हत्या करण्यात आली. याचा तपास एनआयएने सुरु केला. त्यामुळेच अमरावती पोलीसही जागे झाले व त्यांना कोल्हे यांच्या हत्येमागील दहशतवाद्यांचे कनेक्शन दिसले. पोलिसांनी २ जुलैला पत्रक काढले व ही हत्या आयएसआयएसच्या मानसिकतेतून झाल्याचे सांगितले. त्यामुळे याप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री व अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपने ट्विटमध्ये केली आहे.

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. आमदार रवी राणा यांनी विधानसभेत लक्ष्यवेधी सुचनेद्वारे याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली. हे हत्याकांड झाले त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केल्याचा दावा राणा यांनी केली. यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल अशी घोषणा केली आहे. शुक्रवारी झालेल्या घोषणेनंतर भाजपनेही ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 

First Published on: December 24, 2022 1:40 PM
Exit mobile version