गंभीर गुन्ह्यातील आरोपीला भाजप नगरसेविकेची मदत

गंभीर गुन्ह्यातील आरोपीला भाजप नगरसेविकेची मदत

उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर मनपाच्या जी आय एस मॅपिंगला विरोध करताना सरकारी कागदपत्रे फाडणे, कर्मचार्‍यांना धमक्या देणे आदी गुन्हे दाखल झालेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या परमानंद गरेजा या आरोपीला आर्थिक सहाय्य म्हणून भाजपच्या नगरसेविकेने चक्क एक महिन्याचे मानधन दिले आहे .

उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर निर्धारणचे काम कोलब्रो या कंपनीला दिले असून या कंपनीच्या कर्मचार्‍यांद्वारे जी एस आय मॅपिंगचे काम सुरू आहे. या कंपनीला दिलेले कंत्राट हा इतर महापालिकांच्या तुलनेने जास्त दराने असून कर आकारणीदेखील जास्त आहे, असा आरोप केला जात आहे. गेल्या आठवड्यात कोलब्रो कंपनीच्या कर्मचार्‍यांचे कर निर्धारण आणि सर्वेक्षणचे काम सुरू असताना परमानंद गरेजा या व्यापार्‍यांच्या पदाधिकार्‍याने या कामाला विरोध केला आणि कागदपत्रे फाडून कर्मचार्‍यांना धमक्या दिल्या यानंतर स्वतः गरेजा यांनी हा व्हिडिओ व्हायरल करून लोकांना वाढीव मालमत्ता कर न भरण्याचे आवाहन केले होते.

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी परमानंद गरेजा यांच्या विरोधात गुन्हा होऊन त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. आरोपी सध्या आधारवाडी तुरुंगात सजा भोगत आहेत. सध्या सोशल मीडियावर परमानंद गरेजा यांना मदत करण्याचे आवाहन काही सामाजिक संघटना करीत आहेत. या आवाहनाला दाद देत दीपा नारायण पंजाबी या भाजप नगरसेविकेने तिचे एक महिन्याचे मानधन ( 10 हजार रुपये ) परमानंद गरेजा यांना देण्यात यावे, असे लिखित पत्र महानगरपालिकेला दिले आहे. मनपाच्या कामाला विरोध करणार्‍या व तुरुंगात असलेल्या आरोपीला स्वतःचे मानधन देणार्‍या दीपा पंजाबी हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत
यासंदर्भात नगरसेविका दीपा पंजाबी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, परमानंद गरेजा हे शहरातील समाजसेवक असून त्यांच्या घरची परिस्थिती सध्या हलाखीची आहे, त्यामुळे मी मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: July 24, 2019 4:00 AM
Exit mobile version