राणी बागेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

राणी बागेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

भायखळ्याच्या राणी बागेचे आधुनिकीकरण करणे, प्राणी संग्रहालयात परदेशातून दुर्मीळ प्राणी आणणे व इतर विकासकामे करण्यासाठी काढलेली निविदा भ्रष्टाचाराच्या अनुषंगानेच १८५ कोटींपर्यंत फुगविण्यात आली होती. विकासकामांबाबतची ही निविदा मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी रद्द केली असली, तरी ही निविदा काढण्यात सहभागी सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदार यांचे व्यवहार संशयास्पद असल्याने सर्वांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे. यासंदर्भात चहल यांना भाजपतर्फे पत्रही पाठवण्यात आले आहे.

राणी बागेत सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांची प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी, माजी नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, सुरेखा लोखंडे, माजी नगरसेवक कमलेश यादव, भालचंद्र शिरसाट, राणी बाग प्राणी संग्रहालय संचालक डॉ. संजय त्रिपाठी, अभियंते तिवारी, प्राण्यांचे डॉक्टर देव शिरसाट, सहाय्यक सुरक्षा अधिकारी छगन काळे हे उपस्थित होते.

राणी बागेत प्राण्यांचे पिंजरे, उद्यानाचे आधुनिकीकरण, विकासकामे आदींसाठी पालिका व सत्ताधारी यांनी कंत्राटदार हायवे व स्कायवे यांच्या व स्वतःच्या फायद्यासाठी कमी खर्चाऐवजी १८५ कोटींचे टेंडर काढले होते. ते नंतर १०६ कोटींवर आणण्यात आले होते. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार होता. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेता त्यावेळी भाजपने त्या टेंडरला कडाडून विरोध केला. मात्र सत्ताधारी पक्षाने त्या विरोधाला न जुमानता मंजुरी दिली. त्यानंतरही भाजपने पालिकेत त्याविरोधात आवाज उठवून सदर कामातील भ्रष्टाचाराबाबत आरोप करून चौकशी व कारवाईची मागणी केली होती. परंतु पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले होते, अशी माहिती भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणी बागेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे आता पालिका आयुक्त चहल यांनी अखेर राणी बागेचे ते कोट्यवधी रुपयांचे कंत्राटं रद्द केले. यासंदर्भातील लेखी पत्र पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांना पाठवले असून सदर कामात अनियमितता होणार असल्याने टेंडर रद्द केल्याचे स्पष्ट म्हटले आहे, असे प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा यांनी सांगितले.

या संपूर्ण टेंडर प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांचे आणि सत्ताधार्‍यांचे वर्तन संशयास्पद असल्याने त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे व विनोद मिश्रा यांनी केली आहे.

त्या’ निविदेवर उगीच राजकारण -किशोरी पेडणेकर
राणी बागेतील प्राणी संग्रहालयातील कामांबाबत काढलेली निविदा भाजपने केलेल्या आरोपांमुळे रद्द झालेली नाही. वास्तविक, ही निविदा म्हणजे ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ होते. संबंधित कंत्राटदारांनी निविदेमधील दराबाबत वाटाघाटी करणे अपेक्षित होते. परंतु त्या कंत्राटदाराला बराच वेळ देऊनही त्या कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने निविदा रद्द झाली. त्यावर भाजपकडून उगाचच राजकारण केले जात आहे, असा आरोप माजी महापौर व शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

भाजपने विरोधकांची भूमिका बजावताना उगाचच विरोधाला विरोध न करता काही विषय समजून घेणे व मगच त्यावर आपली भूमिका जाहीर करायला हवी. उगाचच राणी बाग, प्राणी यासंदर्भातील विषयाचे घाणेरडे राजकारण करू नये, असा सल्लाही किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे.

भाजपचे माजी गटनेते व विरोधक प्रभाकर शिंदे यांनी भाजपच्या काही माजी नगरसेवकांसह गुरुवारी राणी बागेतील प्राणी संग्रहालयाला व उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी राणी बागेत आतापर्यंत झालेली विकासकामे व चालू असलेली कामे बघून भाजपवाले निश्चितच १०० टक्के सुखावले असतील. पण ते त्याची कबुली ते कधीच देणार नाहीत. भाजपने कुठे बोट दाखवावे, अशी एकही जागा राणी बागेत नाही.

मात्र, कुरापती काढायची त्यांना सवयच लागलेली आहे. त्यामुळे ते मुंबईकरांसमोर काहीतरी बाब मांडून शिवसेनेला बदनाम करायचा प्रयत्न करतात, असे आरोपही माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

First Published on: April 1, 2022 5:35 AM
Exit mobile version