भाजपकडून यशवंत जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी

भाजपकडून यशवंत जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी

भायखळा ‘ई’ वार्डातील कंत्राटकाम मागे घेण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, वार्डातील दोन अधिकारी यांनी माझ्या कर्मचार्यांना धमकावल्याचा खळबळजनक आरोप यश कॉर्पोरेशन चे भागीदार रमेश सोळंकी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त,पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त वार्डातील सहाय्यक आयुक्त आणि आग्रीपाडा पोलीस स्थानक यांच्याकडे १२ नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात केली आहे. तसेच, याप्रकरणी तातडीने संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंत्र्यांचा नावाचा वापर करणाऱ्या कंत्रादाराचा, त्यामागील सुत्रधाराचा आणि एकूणच षडयंत्राचा पर्दाफाश नावानिशी मीडियासमोरच लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

या प्रकरणात उडी घेत भाजपतर्फे यशवंत जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी यशवंत जाधव व कंत्राटदाराचा संबंधीत कर्मचारी सूरजप्रताप देवडा यांच्यातील धमकीवजा संभाषणाची ऑडीओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हारल झालेली आहे.त्यामुळे पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

रमेश सोळंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीला यशवंत जाधव यांच्या वार्डात १४ स्थापत्य कामे करण्यासाठी लघुत्तम देकार असल्याने टेंडर लागले होते. मात्र या वार्डातील दुय्यम अभियंता व सध्या प्रभारी सहाय्यक अभियंता मनस्वी तावडे आणि कनिष्ठ अभियंता राकेश सागाठिया यांनी माझ्या कर्मचार्यांना काम मागे घ्या, या वार्डात कामे करू नका. अन्यथा तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येईल, अशी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच, यशवंत जाधव , तावडे आणि सागाठिया हे त्रिकुट अपलीक मर्जीतील कंत्राटदारालाच कामे देण्यास इच्छुक असून इतर कंत्रादारांना हे धमकावत आहेत, अशी तक्रार सोळंकी यांनी केली आहे.

आमच्या कंपनीला कंत्राट मिळाले असतानाही वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने कंपनीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे तक्रारदार सोळंकी यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे उद्या माझ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्यास यशवंत जाधव व संबंधित पालिका अधिकारी जबाबदार राहतील, असे रमेश सोळंकी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, माझे कर्मचारी सुरजप्रताप देवडा यांना, २७ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री १०.३७ वाजताच्या सुमारास यश कॉर्पोरेशन कंपनीने कंत्राटकाम मागे घ्यावे यासाठी फोन करून धमकी दिल्याचा गंभीर आरोपही रमेश सोळंकी यांनी सदर तक्रारीत केला आहे. या संभाषणाची ऑडीओ रेकॉर्डिंग कंत्राटदाराने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. यामध्ये, यशवंत जाधव यांनी, माझ्या वार्डात तुम्ही काम करू नका, जे काम लागले आहे ते मागे घ्या. मी प्रेमाने समजावतो असताना तुम्ही समजून घेणार नसाल तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून मला समजवावे लागेल, अशी धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप कंत्राटदार सोळंकी यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे तूला माझ्या वार्डात काम करण्याची सिस्टीम माहिती नाही का, तू अगोदर ज्या ” टी” वार्डात काम करीत होतास तिथेच काम कर. आता माझ्या वार्डात हे काम मागे घे. तुला पुढे माझ्या वार्डात काम करायचे आहे ना? तू हे काम आज घे इतर वार्डात कामे कर, असे यशवंत जाधव यांनी धमकावल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. तसेच, कंत्राटदाराच्या कर्मचार्यांने सदर कंत्राटकाम रद्द करायला लावू नका, मी गरीब असून एवढे काम करू द्या, अशी विनंती वारंवार यशवंत जाधव यांना केल्याचे या क्लिपिंगमध्ये म्हटले आहे.

मी सदर कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही. माझ्या वार्डात काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून मी केवळ कंत्राटकामाबद्दल माहिती घेतली. त्या कंत्रादाराचे यापूर्वीचे काम योग्य नाही. त्यामुळे मी त्याला काम न करण्याबाबत विनंती केली. मात्र मला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकविण्याचे, माझी व शिवसेनेची बदनामी करण्याचे मोठे षडयंत्र कंत्राटदाराच्या मदतीने रचण्यात आले आहे, असे सांगत यशवंत जाधव यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, या कंत्राटदाराने आतापर्यंत पालिकेत जी काही कामे केली आहेत, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

कंत्राटदाराने “ई” वार्डाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैरे यांना महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांच्या नावाचा वापर करून मी त्यांचा पीए बोलत असल्याचे सांगून कंत्राटकामाबाबत भाष्य केल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केला आहे. या कंत्रादाराचा बोलविता धनी कोण आहे, या कंत्रादाराला काम देण्यासाठी मला काही बड्या व्यक्तींनी फोन केले असून त्याबाबतच्या एक नव्हे चार- चार “ऑडियो रेकॉर्डींग” मी लवकरच मीडियासमोर आणून त्याबाबतच्या एकूणच षडयंत्राचा पुराव्यानिशी पर्दाफाश करणार असल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.
तसेच, मी काहीच धमकीवजा भाषा वापरलेली नाही. उलटकंत्राटदारानेच मला कामात टक्केवारी देण्याची भाषा केली असता मी त्याला चांगलेच फटकारल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

First Published on: December 1, 2020 8:36 PM
Exit mobile version