Polkhol abhiyan: पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक, शिवसेनेचा हात असल्याचा दरेकरांचा आरोप

Polkhol abhiyan: पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक, शिवसेनेचा हात असल्याचा दरेकरांचा आरोप

भाजपने मुंबई शहरात पोलखोल अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा समारोप १ तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. या पोलखोल अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच या अभियानाच्या रथाचे नुकसान करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या रथावर दगडफेक करत हल्ला केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. या हल्ल्यामागे शिवसेनेचा हात असल्याची शक्यता प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार हे पोलखोल अभियान दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे, तो गल्लीबोळापासून मांडण्याचे काम आम्ही अभियानाच्या माध्यमातून करतो आहोत. लोकशाहीत आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही लोकशाहीत आमचे म्हणणे मांडू शकतो. परंतु आता काही गुंड प्रवृत्ती हाताशी धरून पोलखोल अभियान दाबून टाकण्याचा प्रयत्न शासनाचा नाही ना ? यामागे शिवसेनेचा हात आहे का ? असाही सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. या घटनेत हल्लेखोराला जर पोलिसांनी अटक केली नाही, तर आम्ही पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्या पोलखोल अभियानाच्या निमित्ताने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्यासाठी सरकार जबाबदार असेल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

मुंबई पोलीस आयुक्त हे सरकारचे राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. आम्ही लोकांसाठी पोलखोल करतो आहोत तर मुंबई पोलीस हे सरकारचे गुलाम असल्यासारखे वागताहेत. इफ्तार पार्टी तसेच राजकीय कार्यक्रमात मुंबई पोलीस व्यस्त आहेत. पण पोलखोल यात्रेला अडथळा येणार नाही याबाबतची काळजी मुंबई पोलीस आयुक्तांनी घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.


 

First Published on: April 19, 2022 11:02 AM
Exit mobile version