भाजप-सेनामध्ये ऑडिओ धिंगाणा

भाजप-सेनामध्ये ऑडिओ  धिंगाणा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकायला तयार

मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिवसेनाच्या वाद टोकाला जावून पोहचला आहे. कूटनीती, साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समजावून सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायला तयार आहोत, असा टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
बुंद से गई ओ हौद से नही आती, असे म्हणत आम्ही फक्त क्लिप समोर आणली. त्यांना काय कारवाई करायची ती करू द्या. आम्ही त्या कारवाईला सामोरे जायला तयार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप जाहीर सभेत ऐकवली. पण ऑडिओ क्लिपमध्ये बदल करुन ती लोकांना ऐकवण्यात आली. साम-दाम-दंड- भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो. कूटनीतीने प्रहार करणाऱ्यांना, कूटनीतीचा उतारा द्यावा लागतो, असे माझे म्हणणे होते अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचाच ठाकरेंनी समाचार घेतला. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईचे काम पाहण्यासाठी आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केली. कळत नकळत मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केले की, ऑडिओ क्लिपमधील बोलणे त्यांचेच आहे. त्यात बदल केल्याचे त्यांना वाटत असल्यास त्यांनी ती तपासावी, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले.

आम्ही जरी ऑडिओ क्लिप बदल करून दाखवली असेल, तरी मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केले आहे की, तो आवाज त्यांचा आहे. त्या प्रकरणातला जो महत्वाचा गाभा आहे, तो आम्ही समोर आणला. पूर्ण भाषण समोर आणायची गरज नव्हती, असेही ते म्हणाले. तसेच, पैसे वाटतानाच्या गोष्टीसुद्धा आम्ही सगळ्यांसमोर आणल्या आहेत. आता त्याबाबतसुद्धा विचार करावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. ती ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची असली तरी शिवसेनेने ती बदल करून जनतेसमोर आणली. क्लिपची पहिली आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडघशी पडली असती. आता मी स्वत:च ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे. मी काही चुकीचे केले असेल तर निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जाण्यास मी तयार आहे. पण मी निर्दोष सुटलो तर क्लिपमध्ये बदल करुन ती जनतेसमोर आणून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

First Published on: May 28, 2018 7:34 AM
Exit mobile version