भाजपने दिलेला शब्द पाळावा; बैठकीनंतर शिवसेना आमदारांची भावना

भाजपने दिलेला शब्द पाळावा; बैठकीनंतर शिवसेना आमदारांची भावना

राज्यात कुणाची सत्ता स्थापन होईल, हा पेच निर्माण झाला असतानाच आज, गुरुवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर पार पडली. साधारण ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर युती होताना भाजपने दिलेला शब्द पाळावा, अशी भावना शिवसेना आमदारांनी व्यक्त केली आहे. अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी सर्व आमदारांनी एकमुखाने केली आहे. तसेच सत्तास्थापनेबाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असेही काही आमदारांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर ही बैठक पार पडली. सत्तेतल्या ५०-५० टक्के वाट्यावर शिवसेना अजूनही ठाम असल्याचे दिसते. लोकसभेच्या वेळी युतीचे जे ठरले होते, तसेच व्हावे याचाच पुनरुच्चार या बैठकीत झाला, अशी माहिती या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.

First Published on: November 7, 2019 1:59 PM
Exit mobile version