आता चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘मी असं बोललोच नाही!’

आता चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘मी असं बोललोच नाही!’

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं ‘न भूतो’ अशा आघाडीचं सरकार पहिल्यांदाच सत्तेत आल्यापासून सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपने सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप या २५ वर्ष मित्रपक्ष राहिलेल्या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाल्याचं चित्र होतं. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठा गहजब उडाला होता. पण आता त्या वक्तव्यावरुन घुमजाव करत आपण असं काही बोललोच नव्हतो, असं पाटील म्हणाले आहेत.

काय म्हटले चंद्रकांत पाटील?

‘शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र येण्यास आम्ही तयार आहोत असं वक्तव्य मी अजिबात केलेलं नसून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ‘शिवसेनेशी युती करण्याचा आमचा कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेनाच नाही तर इतर कोणत्याही पक्षाला आम्ही कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही’, असं देखील ते म्हणाले. ‘जर आमचं सरकार आलं, तर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण नरेंद्र मोदींच्या नावे विजयी व्हायचं आणि नंतर भलतंच काहीतरी करायचं, हे चालणार नाही’, असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील यांच्या युतीसंदर्भातल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा देखील करून झाल्यानंतर पाटील यांनी घुमजाव केलं आहे. ‘पाटील यांचं वक्तव्य एका प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात आलं असून आमचा शिवसेनेला आणि शिवसेनेचा आम्हाला युतीसाठी कोणताही प्रस्ताव नाही’, असं फडणवीस म्हणाले होते.

काय म्हणाले होते भाजप प्रदेशाध्यक्ष?

‘राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू’, असं पाटील म्हणाले होते. मात्र, त्या मुद्द्यावरून नवी राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी घुमजाव केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

First Published on: July 30, 2020 5:32 PM
Exit mobile version