‘झोपडपट्टीवासियांच्या जागेचा गैरव्यवहार करणाऱ्या महापौरांवर कारवाई करा’

‘झोपडपट्टीवासियांच्या जागेचा गैरव्यवहार करणाऱ्या महापौरांवर कारवाई करा’

झोपडपट्टीवासियांच्या (SRA) जागेचा गैरव्यवहार करणाऱ्या मुंबईच्या महापौरांवर ताबडतोब कारवाई व्हावी, त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे. २००६/२००८ मध्ये मूळ लाभार्थ्यांना गोमाता जनता (SRA), सोसायटी, गणपतराव कदम मार्ग, वरळी येथे सदनिका देण्यात आल्या. बिल्डिंग क्रमांक २ मधील ६०१ क्रंमाकांचा गाळा संबंधित मालकाला देण्यात आला होता. या गाळ्याच्या मालकीवर कुठेही मुंबईच्या महापौर किंवा त्यांच्या परिवारांचे नाव नव्हते. मात्र मागच्या ८ ते १० वर्षांपासून महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यावर कब्जा केला आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला.

किरीट सोमैय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, वरळीतील गोमाता जनता सोसायटीमध्ये महेश लक्ष्मण नरमुल्ला या लाभार्थ्यांच्या नावाने एक गाळा देण्यात आला आहे. परंतु, त्या गाळयावर मागच्या ८ ते १० वर्षांपासून महापौर किशोरी पेडणेकर यांचा ताबा आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पण आपल्या घराचा पत्ता हाच दिला आहे.

तसेच याच सोसायटीमधील बिल्डिंग क्र. २ मधील तळमजल्यावर गाळा क्र. ४ हा देखील मूळ लाभार्थ्याला देण्यात आला आहे. परंतु या गाळ्यावर देखील किशोरी पेडणकर परिवाराच्या मालकीच्या किश कॉपोरेशनचे कार्यालय थाटलेले आहे. महापौरांनी स्वत: किश कॉपोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय स्थापित केलेले आहे. गेल्या आठवड्यात मी स्वत: तसेच, SRA अधिकाऱ्यांनीही भेट दिली आणि या जागेची पाहणी केली. या रहिवासी जागेचा व्यावसायिक उपयोग करण्यात येत असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला.

यापैकी बिल्डिंग क्र. १, तळमजला, येथे रहिवाशी उपयोगाचे प्रमाणपत्र आहे. त्यावर या सदनिका लाभार्थींना देण्यात आल्या, त्यात कुठेही मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर किंवा त्यांच्या परिवाराचे नाव नाही. मुंबईचे महापौर आणि त्यांचे कुटुंबिय यांनी बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापर करत आहेत. त्यावर महापालिका आणि SRA नी अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही, त्यामुळे ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी सोमैया यांनी केली.

First Published on: September 23, 2020 6:53 PM
Exit mobile version