पालघरमध्ये भाजप पदाधिकार्‍यांचे बंड

पालघरमध्ये भाजप पदाधिकार्‍यांचे बंड

मानखुर्दमध्ये भाजपच्या दोन गटात हाणामारी

शिवसेनेला जागा सोडल्यामुळे पालघरमधील भाजप पदाधिकारी नाराज झाले असून निर्णय न बदलल्यास राजीनामे देण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या सभेत एकमताने घेण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूत झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष भरत रजपूत, आरोग्य सभापती निमील गोहिल, नगरसेवक विशाल नांदलस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गावीत यांना मागील पोटनिवडणुकीत तिकीट देताना किंवा आता शिवसेनेला जागा सोडताना पक्षाकडून स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले गेले नाही.

आम्ही रक्ताचे पाणी करून पक्षाचे काम करीत असताना ही सीट सेनेला सोडली तर भाजपाचे पालघरमधून अस्तित्व राहणार नाही. आपल्याच पक्षातील लोक गावीत यांना मातोश्रीवर घेऊन गेले. एकदिवस आपल्यावरही अशी पाळी येईल. त्यामुळे राजीनामा दिलेला बरा, असे परखड मत नगराध्यक्ष भरत रजपूत यांनी या सभेत मांडून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

ते राजेश खन्ना आणि आम्हीअमरिश पुरी आहोत का?

तर भाजपकडे उमेदवार नाहीत का, गावीत काय राजेश खन्ना आहे आणि आम्ही काय अमरीश पुरी आहोत का? असा संतप्त सवालही यावेळी करण्यात आला. आपल्या पक्षाचे खासदार असूनही गावितांनी आपल्यासाठी कधी काम केले नाही. तर शिवसेनेत गेल्यावर ते आपल्याला काय विचारतील? म्हणून आम्ही कधीही त्यांचा प्रचार करणार नाही आणि सेनेला सपोर्ट करणार नाही, असे नगरसेवक विशाल नांदलस्कर यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ही जागा भाजपने लढवावी, असा ठराव करून त्यात राजीनाम्याचा इशाराही देण्यात आला आहे.

First Published on: April 1, 2019 4:33 AM
Exit mobile version