पाच अधिकार्‍यांवर ठपका

पाच अधिकार्‍यांवर ठपका

RAILWAY BRIDGE COLLAPSE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील कोसळलेल्या पुलाच्या बांधकामाबाबत पूल विभागाच्या दोन निवृत्त अधिकार्‍यांसह एकूण पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये पूल विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील व तत्कालीन सहायक अभियंता एस.एफ.काकुळते यांना निलंबित करण्याचे आदेश बजावण्यात आले. तर स्ट्क्चरल ऑडिट करणार्‍या डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनालिस्ट प्रायव्हेट कंपनीसह २०१२-१४ मध्ये काम करणार्‍या आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही बजावले आहेत. दरम्यान या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ जण जखमी झाले आहेत. या दुघर्टनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्य अभियंता (दक्षता) यांची चौकशी समिती गठीत केली. या समितीला २४ तासात आपला प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी आपला चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला.

या प्राथमिक अहवालामध्ये या पुलाची दुरुस्ती २०१२-१४ या कालावधीत करण्यात आली होती. या पुलाचे काम आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केले होते. त्यामुळे सहा वर्षातच हा पूल कोसळला. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या या कंपनीवर ठपका ठेवून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. तसेच या पुलाच्या बांधकामावर काळजीपूर्वक देखरेख न ठेवणार्‍या तत्कालीन पूल विभागाचे प्रमुख अभियंता (निवृत्त) शितला प्रसाद कोरी, तत्कालीन उपप्रमुख अभियंता(निवृत्त) आर.बी.तरे यांच्यासह पूल विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील, ए.आय. इंजिनिअर आणि सहायक अभियंता एस.एफ.काकुळते यांच्यावर ठपका ठेवला. तर स्ट्रक्चरल ऑडिट करणार्‍या डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कंपनीने हे पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे चांगल्या स्थितीतील पूल कोसळल्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देऊन त्यांची पुढील सर्व कामे त्वरीत थांबवून त्यांचे पैसे न देण्याच्या सूचना केल्या आहेत.

डिसेंबर २०१६ मध्ये पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मुंबई शहर व उपनगरांमधील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी स्वतंत्र कंपन्यांची निवड करण्यात आली होती. संपूर्ण मुंबईतील एकूण २९६ रस्ते पूल, पादचारी पूल व उड्डाणपुलांचे ऑडिट करण्यात आले होते. डिसेंबर २०१६मध्ये पूर्ण झालेल्या या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ११० पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला होता. तर १८ पूल त्वरीत तोडणे, १०७ पुलांची किरकोळ दुरुस्ती व ६१ पुलांची मोठ्या स्वरुपातील दुरुस्ती करण्याचे या अहवालात नमुद करण्यात आले होते. शहरातील पुलांचे ऑडिट करण्यासाठी डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनालिस्ट प्रायव्हेट कंपनीची निवड करण्यात आली होती. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांच्या विरोधात त्वरीत पोलीस तक्रार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

*पूल विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील : निलंबित 
*तत्कालीन सहायक अभियंता एस.एफ.काकुळते : निलंबित
*कार्यकारी अभियंता ए.आय. इंजिनिअर : विभागीय चौकशी
*तत्कालीन प्रमुख अभियंता (निवृत्त) शितला प्रसाद कोरी : सर्वंकष विभागीय चौकशी
*तत्कालीन उपप्रमुख अभियंता(निवृत्त) आर.बी.तरे : सर्वंकष विभागीय चौकशी
*स्ट्रक्चरल ऑडिट : डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कंपनी- काळ्या यादीत
*तत्कालीन कंत्राटदार : आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चर- काळ्या यादीत

First Published on: March 16, 2019 5:45 AM
Exit mobile version