अवघ्या ५० रुपयांमध्ये रक्तासह इतरही चाचण्या

अवघ्या ५० रुपयांमध्ये रक्तासह इतरही चाचण्या

नगरसेवकाला २४ लाखांचा भुर्दंड; पालिकेनी केली कारवाई

मुंबई महापालिकेच्या विशेष रुग्णालये, तसेच उपनगरीय रुग्णालयांसह दवाखाने आणि प्रसुतीगृहांमध्येही रुग्णांच्या रक्त तपासण्या आणि इतर तपासण्या अवघ्या ५० रुपयांमध्ये होणार आहेत. आपली चिकित्सा योजनेतंर्गत दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना नि:शुल्क सेवा दिली जाणार आहे. तर इतर रुग्णांना या मूलभूत आणि प्रगत चाचण्यांची चिकित्सा अवघ्या ५० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय बुधवारी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई महापालिकेची ५ विशेष रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये, १७५ दवाखाने आणि २८ प्रसुतीगृहांमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांच्या रक्त तपासण्यांसह इतर चाचण्यांची सुविधा आपली चिकित्सा योजनेतंर्गत उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी महापालिका रुग्णाकडून मूलभूत नमुना चाचणीसाठी प्रति चाचणी १०० रुपये शुल्क तर मूलभूत चाचणीसाठी २०० रुपये आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी सादर केला होता. बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाचे मनोज कोटक यांनी रुग्णांसाठी १०० व २०० रुपये शुल्क आकारण्याचा निकष काय अशी विचारणा केली. तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या चाचण्यांसाठी शुल्क आकारले जावू नये अशी मागणी उपसूचनेद्वारे केली आहे. यावर सदस्यांना बोलू न देता प्रशासनाला बोलण्याची सूचना अध्यक्षांनी केली.

त्यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी नि:शुल्क सेवा दिल्यास त्याचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली. परंतु विरोधी पक्ष यावर ठाम असतानाच, समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घाईघाईत मतदानात टाकून उपसूचना उडवून लावली. मात्र, त्यानंतर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील रुग्णाला नि:शुल्क आणि इतरांना ५० रुपये शुल्क आकारण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली. याला शिवसेनेच्या मंगेश सातमकर, राजुल पटेल, भाजपचे अभिजित सामंत यांनी पाठिंबा दिला. तर रवी राजा यांनी या उपसूचनेला विरोध करत दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांची संख्याच कमी आहे. त्यामुळे सरसकट सर्वांना नि:शुल्क सेवा देणेच योग्य असल्याची बाजू मांडली.

First Published on: January 17, 2019 5:14 AM
Exit mobile version