नद्या, नाल्यांमधील १००% गाळ मुदतीपूर्वीच काढल्याचा पालिकेचा दावा 

नद्या, नाल्यांमधील १००% गाळ मुदतीपूर्वीच काढल्याचा पालिकेचा दावा 
मुंबई: मुंबईतील नद्या, लहान – मोठ्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाईच्या कामांअंतर्गत ३१ मे पूर्वी ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरले होते. मात्र मुदतीच्या एक आठवडा अगोदरच (२५ मे दुपारी १२- मे पर्यंत) नद्या, नाल्यांमधून शंभर टक्के पेक्षाही जास्त म्हणजे ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन इतका गाळ काढण्यात आला आहे. साधारणपणे ५,०४५ मे. टन जास्त गाळ नद्या व नाल्यांमधून काढल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.  गतवर्षीप्रमाणेच यंदाही नद्या, नाल्यांमधून १००%  पेक्षाही आणखीन जास्त प्रमाणात गाळ काढण्याचे काम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा दावाही पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे यंदाही गाळाचे प्रमाण १००% पेक्षाही जास्त म्हणजे ११५% पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
परिणामी नालेसफाईच्या कंत्राट कामांचा खर्च काही कोटीने वाढण्याची लक्षणे दिसून येत आहेत. कारण की, जेवढा गाळ निघेल तेवढ्या गाळाचे ( वाहतूक यंत्रणेसह)  पैसे पालिका कंत्राटदाराला देणार आहे. त्यामुळे साहजिकच गाळ काढण्याचे प्रमाण वाढल्यास त्यासाठी कंत्राटदाराने केलेल्या खर्चाचा मोबदला त्याला द्यावाच लागणार आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. यंदा गाळ काढण्याची सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व  मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू यांनी यंत्रणेला दिले होते.
त्यानुसार, शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. उद्दिष्ट गाठले गेले असले तरी त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम यापुढेही सुरु राहणार आहे, अशी माहिती उपआयुक्त (पायाभूत सुविधा)  उल्हास महाले यांनी दिली आहे.
आतापर्यंत काढण्यात आलेल्या गाळाबाबतचा तपशील
१)  शहर विभाग -:
३७ हजार ९४६ मेट्रिक उद्दिष्ट/ पैकी ३५ हजार ७५६ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण ९४.२३ टक्‍के आहे.
२) पूर्व उपनगरे -:
१ लाख १७ हजार ६९२ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी १ लाख १९ हजार ३५९ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण १०१.४२ टक्‍के आहे.
३) पश्चिम उपनगरे -:
 १ लाख ९३ हजार ९३३ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी १ लाख ९४ हजार ६२२ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण १००.३६ टक्‍के आहे.
४) मिठी नदी -:
 २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी,  आतापर्यंत १ लाख ९५ हजार ५६६ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण ९०.४७ टक्‍के आहे.
५) लहान नाले -:
 ३ लाख ६५ हजार ६३३ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी,  ३ लाख ८५ हजार ६४४ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण १०५.४७ टक्‍के आहे.
६) महामार्गांलगतचे नाले -:
एकूण ४८ हजार ५०२ मेट्रिक टन उद्दिष्ट/ पैकी, ५३ हजार ९७७ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण १११.२९ टक्‍के आहे.
७) नाल्यांमधून काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी आतापर्यंत वाहनांच्या ५१ हजार ४९० फेऱया झाल्या आहेत.
८) नालेसफाई कामांची आतापर्यंत १ लाख ५४ हजार ५०० हून अधिक छायाचित्रे, ७२ हजार ३०० पेक्षा अधिक व्हिडिओ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
First Published on: May 25, 2023 8:09 PM
Exit mobile version