गोरेगाव नेस्को कोविड सेंटरच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार नाही; महापालिकेचे स्पष्टीकरण

गोरेगाव नेस्को कोविड सेंटरच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार नाही; महापालिकेचे स्पष्टीकरण

नेस्को कोविड सेंटरमध्ये १ हजार ५०० नवीन बेडचे उद्घाटन

गोरेगावमधील नेस्कोतील कोरोना कोविड केंद्राच्या कंत्राटप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच महापालिकेकडून यासाठी दिलेल्या साहित्यांचे भाडे ९० दिवसांकरता अर्थात तीन महिन्यांसााठी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हे केंद्र बंद होईपर्यंत पुढील कालावधीत पुरवठादारानेच मोफत देखभाल आणि परिरक्षण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या सर्व अटी व शर्ती ‘मेसर्स रोमेल रिॲल्टर्स’ यांनी स्वीकारल्याने त्यांना या कामाचे कार्यादेश देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात आलेल्या कोरोना आरोग्य केंद्राच्या उभारणीत तसेच त्याच्या प्रशासकीय कार्यवाहीमध्ये कोणतीही आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झालेली नाही. उलटपक्षी हे केंद्र उभारताना व कार्यान्वित करताना महानगरपालिकेला वाजवी आणि रास्त दरामध्ये सेवा मिळण्यासह कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून लाभ होईल, अशीच कार्यवाही करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

नेस्कोच्या जागेत १०० खाटांचे अलगीकरण कक्ष उभारण्यासाठी १० एप्रिल २०२० रोजी काही मंडप डेकोरेटर्सकडून दरपत्रिका मागवण्यात आल्या. यामध्ये ‘मेसर्स न्यू इंडिया डेकोरेटर्स’ यांचे दर सर्वात कमी असल्याने त्यांना हे काम सोपविण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडून कार्यवाही योग्यरित्या होत नसल्याचे आणि काम असमाधानकारक असल्याचे आढळून आल्याने ‘मेसर्स न्यू इंडिया डेकोरेटर्स’ यांनी दिलेल्या दराप्रमाणे काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली. आणि त्यांना १०० वरुन प्रारंभी ८५० तर त्यानंतर २ हजार रुग्ण-शय्यांची (बेड) करण्याचा आणि होणारा काही खर्च महानगरपालिका निधीमधून तर काही खर्च ‘सीएसआर’ निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही रक्कम देण्यात येणार अल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

कंत्राटदाराने महापालिकेला सव्वा कोटींची मदत केली

या कंपनीला पाणीपुरवठा आणि धुलाई खर्च वगळून एकूण ८ कोटी ४१ लाख रुपयांचे (जीएसटी वगळता) कार्यादेश बजावण्यात आले. परंतु केंद्र बंद झाल्यानंतर पुरवण्यात आलेले काही साहित्य जसे पंखे, प्लास्टिक खुर्च्या, वीजेचे दिवे, मेडिकल बेडस्‌, गाद्या, उश्या, चादरी, सलाईन स्टँड, विद्युत फिटिंग, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सर्व साहित्य महानगरपालिकेस देणगी स्वरुपात देण्याचे ‘मेसर्स रोमेल रिॲल्टर्स’ यांनी मान्य केले आहे. तसेच ज्यावेळी त्यांना पुरवठ्याचा कार्यादेश दिला. त्यावेळी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत किमान काही वस्तू देण्याचे त्यांना सुचवण्यात आले होते. त्यानुसार पुरवठादाराने क्ष-किरण (एक्‍स रे) संयंत्र, ऑक्सिजन ड्युरा सिलेंडर्स, स्टील रॅक्स, पोर्टा कॅबिन्स, डीटीएच कनेक्शन, डॉक्टर्सचे क्युबिकल्स्‌, लॉकर्स, स्टील कपाटे इत्यादी सुमारे १ कोटी ६ लाख रुपये रकमेच्या वस्तू महानगरपालिकेस दिलेल्या आहेत.

एवढेच नव्हे तर त्यांनी कोणतीही अतिरिक्त आकारणी न करता काही साहित्य अधिकच्या संख्येने उपलब्ध करुन दिले आहे. उदाहरणार्थ १ हजार खुर्च्यांऐवजी २ हजार खुर्च्या, २ हजार मेडिकल बेड ऐवजी २ हजार ५० मेडिकल बेड आणि सलाईन स्टँड, २ हजार ऐवजी २ हजार ७० पंखे असे विविध साहित्य त्‍यांनी अतिरिक्त उपलब्ध करुन दिले आहे. पुरवठादाराने सर्व साहित्याचा पुरवठा करुन त्याची जुळवाजुळव, जोडणी, वायरिंग इत्यादी कामे टाळेबंदी काळात युद्धपातळीवर केलेली आहेत. दर चर्चेअंती वाजवी दिलेले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

First Published on: July 3, 2020 10:19 PM
Exit mobile version