मुंबई पालिकेची स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा! मिळणार ४ लाख ५० हजारांची बक्षिसं!

मुंबई पालिकेची स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा! मिळणार ४ लाख ५० हजारांची बक्षिसं!

मुंबई महानगर पालिका

मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत महानगरपालिकेच्‍या हद्दीतील निवासी संकुल, मोहल्ला, रुग्णालये, हॉटेल्स, शाळा, बाजार संघटना, शासकीय कार्यालये आदींची स्‍वच्‍छता तपासणी करुन विजेत्‍यांना पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरविले जाणार आहे. या स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होता यावे, यासाठी इच्‍छुकांना २७ नोव्‍हेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. या स्पर्धेमध्ये विविध प्रवर्गात मिळून एकूण ४ लाख ५० हजार रुपयांची १३ पारितोषिके दिली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या गृह व नागरी मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत निकष आखून दिले आहेत. या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये मुंबई महानगरपालिका सहभागी होत आहे. त्याचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, मुंबईतील सर्व २४ विभागांतील निवासी संकुल, मोहल्ला, महानगरपालिका तसेच शासकीय कर्मचारी निवासस्थान, रुग्णालये, बाजारपेठा (मार्केट असोसिएशन), हॉटेल्स, शाळा, आदींची स्वच्छतेच्या दृष्टी‍ने तपासणी आधारे स्पर्धा घेतली जाणार आहे. यातील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करुन महानगरपालिकेच्यावतीने गौरविण्यात येणार आहे.

ही स्वच्छता स्पर्धा घेण्यासाठी महानगरपालिकेने ‘मे. युनायटेड वे मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेची नेमणूक केली आहे. या स्पर्धेमध्‍ये सहभागी होता यावे, यासाठी इच्‍छुकांचे अर्ज
https://www.unitedwaymumbai.org/mcgmsurvekshan  या संकेतस्थळावर दिनांक २७ नोव्‍हेंबर, २०२० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तपशिलवार माहितीसह भरणे आवश्यक आहे.

यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग ३ आर तत्व आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावरील जिंगल, रेखांकने, भित्तीपत्रिका, चित्रफिती,‍ भित्तीचित्रे व पथनाट्ये यांचीदेखील स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये (१) जिंगल, (२) चित्रफित, (३) पोस्टर/रेखांकन, (४) भित्तीचित्र, (५) पथनाट्ये या पाच उपप्रकारांमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केली जातील.

या स्पर्धेच्या अनुषंगाने अधिक माहिती हवी असल्यास, सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या अखत्यारितील कार्यकारी अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) स्वच्छ भारत अभियान यांचे कार्यालय, ५ वा मजला, खटाव मार्केट इमारत, ग्रँट रोड (पश्चिम), दूरध्वनी क्रमांक ०२२-२३८५०५७२ येथे संपर्क साधावा.

First Published on: November 18, 2020 6:49 PM
Exit mobile version