आता कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास ४८ तासांत नोंद बंधनकारक; अन्यथा कारवाई!

आता कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास ४८ तासांत नोंद बंधनकारक; अन्यथा कारवाई!

प्रातिनिधिक छायाचित्र

खासगी रुग्णलयांकडून कोविडच्या मृत्यूच्या नोंदी पाठवल्या जात असून यापुढे ४८ तासांच्या आत जर रुग्णालयाने रुग्णाच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरच्या संकेतस्थळावर न केल्यास संबंधित रुग्णालयाविरोधात एपीडेमिक अॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा अखेरचा इशारा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे. चहल यांच्या निर्देशानुसार, सर्व रुग्णलयांना अखेरची संधी आता देण्यात आली असून त्यासाठीचं सुधारीत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये आयुक्तांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी १० जून रोजी सर्व खासगी रुग्णालयांना कोविडची बाधा झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या विषयीची आकडेवारी व तपशील ४८ तासांच आत निर्धारित नमुन्यामध्ये आयसीएमआरच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्यानंतरही विशेषत: खासगी रुग्णालयांकडून या निर्देशाचे पालन होत नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सुधारीत परिपत्रक जारी करत सर्व रुग्णलयांना शेवटची संधी दिली असून जर यापुढे त्यांनी ४८तासांमध्ये मृत्यूची नोंद न केल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. शेवटची संधी देऊनही कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती महापालिकेकडे न कळविल्यास अशा रुग्णालयांवर ‘साथरोग नियंत्रण कायदा १८९७’ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

First Published on: June 18, 2020 9:38 PM
Exit mobile version