BMC : पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रिट रस्ते कामे पूर्ण करा, अन्यथा कारवाई; महापालिका आयुक्तांचा इशारा

BMC : पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रिट रस्ते कामे पूर्ण करा, अन्यथा कारवाई; महापालिका आयुक्तांचा इशारा

मुंबई : पावसाळ्यात रस्त्यांची कामे प्रलंबित राहिल्यास नागरिकांना त्रास होवू शकतो. वाहतुकीची समस्याही निर्माण होवू शकते. त्यामुळे सिमेंट काँक्रिट व डांबरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी (३१ मे पूर्वी) पूर्ण करावीत, असे आदेश पालिका आयुक्त पावसाळ्यात रस्त्यांची भूषण गगराणी यांनी रस्ते विभागाच्या अधिकारी, अभियंते यांना दिले आहेत. तसेच, जर पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदार आणि अभियंते यांना जबाबदार ठरविण्यात येईल, असा इशारा देत कायदेशीर कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. (BMC Complete cement concrete road works before monsoon otherwise action Warning of Municipal Commissioner to Engineers)

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्‍ते कामांचा आढावा संबंधित रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यानुसार, आदेश देत कारवाईबाबत इशाराही दिला आहे. त्यामुळे आता रस्ते विभाग आणि संबंधित अधिकारी, अभियंते आदींना कामाला लागावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेने शहर व उपनगरे येथील आवश्यक सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने ३९८ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी केले आहेत. त्यापैकी, पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. तर शहर विभागातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पातील निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याबाबतचे आदेश पालिका आयुक्त गगराणी यांनी कंत्राटदार व संबंधित अधिकारी, अभियंते यांना दिले आहेत.

अन्‍यथा कंत्राटदार व अभियंत्‍यांवर जबाबदारी

सिमेंट काँक्रिट रस्‍ते बनविण्‍यासाठी रस्‍ता खणण्‍यापासून ते काम पूर्ण होऊन रस्‍ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो. जर प्राधान्‍याने रस्‍ते पूर्ण करण्‍याकडे लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यादरम्‍यान काँक्रिट रस्त्यांची कामे अपूर्णावस्‍थेत आढळतात. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असुविधांचा सामना करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर कोणत्‍याही परिस्थितीत सध्‍या सुरू असलेली सिमेंट काँक्रिटीकरण रस्‍ते कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील, अन्‍यथा कंत्राटदार व अभियंत्‍यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा थेट इशारा आयुक्तांनी संबंधित अधिकारी, अभियंते, कंत्राटदार यांना दिला आहे. तसेच, ३१ मे २०२४ नंतर सुरु राहतील, अशा प्रकारची रस्‍ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, जेणेकरुन पावसाळ्यात अडचण होवू नये, अशा सूचनादेखील देण्‍यात आल्‍या आहेत.

पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग महामार्गावर दुरुस्ती कामांसाठी कंत्राटदार

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर आवश्यक तेथे डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या सातही परिमंडळांतील विविध रस्त्यांवर मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. लवकरच सेवा रस्त्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे.

पावसाळापूर्व कामांचा महत्वपूर्ण भाग म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.


हेही वाचा – Banganga Lake : बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन आणि परिसराचा सर्वांगीण विकास

Edited By – Vaibhav Patil

First Published on: May 2, 2024 8:56 PM
Exit mobile version