२७३३.७७ कोटींचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प; वाचा सविस्तर:

२७३३.७७ कोटींचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प; वाचा सविस्तर:

मुंबई महानगर पालिकेचा शिक्षण अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेच्या सन २०१९-२०चा शिक्षण विभागाचा २७३३.७७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांना सादर केला. यापूर्वी जाहीर केलेल्या योजनांचा मूर्तस्वरुप देताना शालेय इमारतींच्या दुरुस्तीवर भर दिला आहे. शिवाय भाषा प्रयोगशाळा आणि इयत्ता ५वी ते ८वीच्या शालेय मुलांसाठी टिंकर लॅब सुरू करण्याचे जाहीर करताना मुलांना समुपदेशन आणि क्रिडा अकादमींसाठी आऊटसोर्सिंग करण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

भाषा प्रयोगशाळा

मुलांचे भाषा कौशल्य समृध्द करण्यासाठी भाषा प्रयोगशाळा उभारणी करण्यात येत आहे. ज्यामुळे त्यांच्या संभाषण कौशल्यात वाढ होईल. विद्यमान संगणक प्रयोगशाळा आणि साधनसाम्रगीचा वापर होऊन, कमीत कमी खर्चाच्या या प्रकल्पामुळे इयत्ता ५ वी ते ८ वीच्या मुलांना लाभ होणार आहे. यासाठी १.३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टिंकर लॅब

इयत्ता ५ वी ते ८वीच्या मुलांसाठी उपलब्ध असलेल्या २०८ संगणक प्रयोगशाळांचा अधिकाधिक वापर करून टिंकर लॅब सुरु करण्याचा विचार शिक्षण खात्याने केला आहे. त्यामुळे मुलांना नियमित शिक्षणाबरोबर अतिरिक्त शिक्षणाची जोड मिळणार आहे. टिंकर लॅबमध्ये एखादी वस्तू आणि प्रतिमेचा विचार करून हवा तसा आकार, रुप देवून त्यांची त्रिमिती प्रतिकृती बनवण्यात येणार आहे. यामध्ये स्क्रॅच प्रोग्रॅमिंग, आर्डिनो प्रोग्रॅमिंग वापरासहित थ्रीडी डिझायनिंग आणि प्रिटिंग इलेक्ट्रॉनिक्स रोबोट बनवणे, मोबाईल अॅप विकसित करणे आदींची सुविधा उपलब्ध होईल.

क्रिडा अकादमी

मागील अर्थसंकल्पात शारीरिक शिक्षण विभागाच्या १७ विभागांपैकी ७ विभागांमध्ये नियोजित मैदाने तयार करण्यात आली. परंतु आगामी वर्षात या सात मैदानांवर अकादमी करण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिका शालेय मुलांसाठी फुटबॉल, बॉक्सिंग, ज्युडो, तायक्वांदो, कुस्ती, कबड्डी, टेबल टेनिस, बास्केटबॉल, हॅण्डबॉल या नऊ खेळ प्रकारांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे सर्व खासगी सहभागातून केले जाणार आहे. आवश्यक ते सर्व क्रिडा साहित्य, क्रिडा गणवेश, आहार, तज्ज्ञ मार्गदर्शकांना मानधन आणि सहभाग घेणाऱ्या सर्वांचा प्रवास खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी आगामी वर्षात उर्वरीत १० नियोजित ठिकाणी मैदाने तयार करण्यात येणार असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

महापालिका शालेय मुलांना पेंग्विन दर्शन

राणीबागेत पेंग्विनचे आगमन झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे या पेंग्विनना याची देही याची डोळा पाहण्याची संधी आता महापालिका शालेय मुलांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या मुलांची सहल पेंग्विनसाठी राणीबाग येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे आबासाहेब जऱ्हाड यांनी जाहीर केले.

शालेय मुलांना समुपदेशन

शालेय मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढावा, सहनशीलता वाढावी, त्यांच्यातील नैराश्य दूर करून दैनंदिन जीवनात येणाऱ्या नवनवीन आव्हानांना तोंड देता यावे, यासाठी मानसिकदृष्टया त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी खासगी आणि लोकसहभागातून समुपदेशकांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काही महत्त्वाचे मुद्दे

First Published on: February 4, 2019 2:11 PM
Exit mobile version