पालिका लपवत आहे ५० खाटा; ईएनटी रुग्णालय कोविड करण्याकडे दुर्लक्ष

पालिका लपवत आहे ५० खाटा; ईएनटी रुग्णालय कोविड करण्याकडे दुर्लक्ष

ईएनटी रुग्णालया

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईमध्ये खाटा अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीमध्येही मुंबई महापालिकेकडून ईएनटी रुग्णालय कोविड न करण्याची भूमिका घेत तब्बल ५० खाटांपासून रुग्णांना वंचित ठेवले जात आहे. ईएनटी रुग्णालयाचे कोविडमध्ये रुपांतर करून उपलब्ध होणार्‍या ५० खाटा पालिकेकडून का लपवण्यात येत आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरू होताच महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ईएनटी रुग्णालय तातडीने कोविड केले होते. या रुग्णालयात १४ ऑक्सिजन खाटा, तर ३६ सर्वसाधारण खाटा अशा ५० खाटा आहेत. गतवर्षी हे रुग्णालय कोविड केल्याने त्याचा रुग्णांना मोठा फायदा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दुपटीने वाढत असताना आणि ऑक्सिजनसह अन्य खाटा अपुर्‍या पडत असतानाही ईएनटी रुग्णालय पालिकेकडून अद्यापही कोविड केलेले नाही. या रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, ऑक्सिजनची गरज असलेल्या १४ जणांना उत्तम उपचार मिळू शकतात. मात्र पालिका आयुक्त याकडे दुर्लक्ष करत आहेत.

ईएनटी रुग्ण हे गंभीर स्वरूपात मोडत नाहीत. मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन, राजावाडी, शताब्दी रुग्णालयांमध्ये ईएनटी ओपीडीची सुविधा आहे. त्यामुळे मुंबईबाहेरून किंवा उपनगरातून येणार्‍या रुग्णांना येथे सहज उपचार मिळू शकतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोयही होणार नाही. फोर्टमध्ये पालिकेचे आत्मासिंग जेठासिंग ईएनटी रुग्णालयात उपचार करून घेण्यासाठी सध्या दररोज १५० रुग्ण रेल्वे व बसने मुंबईत येत आहेत. यातीलही बहुतांश रुग्ण हे शुल्लक कारणासाठी येत असल्याने रुग्णालय व रस्त्यांवर गर्दी करून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.

ईएनटी रुग्णालय कोविड केल्यास तेथील १४ ऑक्सिजन खाटा व ३६ सर्वसधारण खाटा रुग्णांना उपलब्ध होऊ शकतात. मात्र तरीही पालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून हे रुग्णालय कोविड करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ५० खाटा जाणीवपूर्वक आयुक्तांकडून लपवण्यात येत आहेत का असा प्रश्न पालिकेच्या आरोग्य क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पालिका अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

आमच्या रुग्णालयामध्ये संपूर्ण तयारी आहे. परंतु आमचे रुग्णालय कोविड करण्यासंदर्भात आम्हाला पालिकेकडून कोणतीही सूचना आलेली नाही. पालिकेकडून सूचना आल्यास आम्ही लगेचच कोविड रुग्णालय करू
– डॉ. दीपिका राणा, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, आत्मासिंग जेठासिंग ईएनटी रुग्णालय
First Published on: April 16, 2021 10:01 PM
Exit mobile version