राणा दाम्पत्यामुळे ‘त्या’ इमारतीमधील ८ रहिवाशांनाही पालिकेची नोटीस

राणा दाम्पत्यामुळे ‘त्या’ इमारतीमधील ८ रहिवाशांनाही पालिकेची नोटीस

हनुमान चालीसा प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले खासदार नवनीत राणा (navneet rana) व आमदार रवी राणा (ravi rana) हे दाम्पत्य ज्या खार पश्चिम (khar west) मधील १४ व्या रस्त्यावरील ‘लाव्ही’ इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीमधील आणखी ८ रहिवाशांना बेकायदेशीर बांधकाम केल्याबाबत मुंबई महापालिकेने (mumbai munciple corporation) नोटीसा (notice) बजावल्या आहेत. राणा दाम्पत्यामुळे इमारतीतील इतर रहिवाशीसुद्धा आता अडचणीत सापडले आहेत.

 घराची झाडाझडती घेणार

येत्या ३० मे रोजी या ८ रहिवाशांच्या घरात जाऊन पालिकेचे संबंधित अधिकारी पाहणी करणार आहेत. या रहिवाशांना त्यांच्याकडील आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेचे अधिकारी या पाहणीप्रसंगी त्या रहिवाशांच्या घराची झाडाझडती घेऊन कुठे कुठे बेकायदेशीर बांधकाम झाले ते शोधून त्याचे फोटो काढतील व आवश्यक वाटल्यास व्हिडिओ शूटिंग करतील. त्यावेळी ज्या रहिवाशांचे कागदोपत्री पुरावे योग्य असतील ते पालिकेच्या कायदेशीर कारवाईतून सुटतील. मात्र ज्यांचे पुरावे असमाधानकारक वाटतील त्यांना पालिकेच्या पुढील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

राणा दाम्पत्याला तुर्तास दिलासा

पालिकेने वादाच्या कचाट्यात सापडलेल्या राणा दाम्पत्याच्या घरात बेकायदेशीर बांधकाम आढळून आल्याने त्यांना पालिकेने नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना राणा यांनी पालिकेचे आरोप फेटाळून लावत त्यांच्या घराचे बांधकाम योग्यच असल्याचा दावा केला होता. तसेच, राणा दाम्पत्याने सदर प्रकरणात न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना हे बांधकाम नियमित करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला तुर्तास दिलासा मिळालेला असला तरी त्या इमारतीत राहणाऱ्या ८ रहिवाशांच्या घरात मात्र बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा पालिकेचा आरोप आहे. त्यामुळेच पालिकेने त्याची गंभीर दखल घेऊन या  रहिवाशांना बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीसा बजावल्या आहेत. आता त्यावर ते रहिवाशी काय उत्तरे देतात त्यावर पालिकेची पुढील कारवाई अवलंबून राहील.

First Published on: May 27, 2022 7:22 PM
Exit mobile version