अंधेरी पूल दुर्घटनेनंतर पालिकेचे कानावर हात

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर पालिकेचे कानावर हात

सोमवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच मंगळवारी सकाळी गोखले पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला.

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेवरून आता आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहे. संपूर्ण घटनेसाठी रेल्वे की पालिका जबाबदार? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. त्यावरून आता गोखले पूल दुर्घटनेसाठी मुंबई महानगरपालिका जबाबदार नसल्याचे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे. दुर्घटनाग्रस्त गोखले पूलाची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वेची आहे. पण, दुर्घटनेवरून आता मुंबई महानगरपालिकेने हातवर केले असून दुर्घटनेला पश्चिम रेल्वे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सकाळी झालेल्या पूल दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर कुपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गोखले पूल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वे ठप्प झाली असून वांद्र ते चर्चगेट आणि अंधेरी ते विरार अशी लोकल सेवा सुरू आहे. शिवाय तब्बल ७ तासानंतर अंधेरीच्या हार्बर लाईनवरून पहिली लोकल मुंबई CSMTच्या दिशेने रवाना झाली आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. तर, मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

केव्हा झाली दुर्घटना

सकाळी ७.३० वाजता अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळला. पुलाचा काही भाग हा रेल्वे ट्रॅकवर पडला असला तरी सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, ५ जण मात्र जखमी झाले असून २ जणांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. पुलाचा भाग कोसळल्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सोमवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरामध्ये पावासाचा जोर वाढला असून ढिगारा उपसण्याच्या कामात देखील जोरदार पावसाचा अडथळा येत आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीएरएफच्या मदतीने सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे.

गोखले पुलाची जबाबदारी कुणाची?

गोखले पुलाची जबाबदारी रेल्वे आणि महानगरपालिका या दोघांची आहे. पण ६० वर्षे जुना असलेल्या पुलाकडे रेल्वे आणि पालिकेने सोयीस्कर कानाडोळा केला असेच म्हणावे लागेल. १९७१ साली मुंबई महापालिकेने गोखले पूल बांधून रेल्वेकडे हस्तांतरीत केला. या जुन्या पुलासंदर्भात स्थानिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. पण स्थानिकांच्या या तक्रारीकडे मग्रुर प्रशासनाने कानाडोळा केला. मात्र सकाळी ७.३० वाजता पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटविषयी पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलणे टाळले. त्यामुळे आता स्ट्रक्चरल ऑडिटवरुन रेल्वे आणि पालिकेत जुंपली असल्याचं चित्र दिसत आहे. सरकारी पातळीवर होणाऱ्या या खेळामुळे नाहक भरडली जातात ती सामान्य माणसे!

First Published on: July 3, 2018 3:19 PM
Exit mobile version