BMC: एका महिन्यात 4,500 कोटींची वसुली होणार? मालमत्ता करवसुलीचे मुंबई महापालिकेसमोर आव्हान

BMC: एका महिन्यात 4,500 कोटींची वसुली होणार? मालमत्ता करवसुलीचे मुंबई महापालिकेसमोर आव्हान

आतापर्यंत 3,569 कोटी रूपयांची मालमत्ताकर वसुली ; अद्यापही 931 कोटी थकीत

मुंबई -: मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत दिलेली मुदत संपल्यावर पालिकेला अपेक्षित 4,500 कोटी रुपयांपैकी 3,196 कोटी रुपयांची कर वसुली (79 टक्के )करता आली होती. मात्र तरीही 1,304 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत राहिला होता. महापालिकेने 1 ते 23 एप्रिल या कालावधीत मालमत्ताधारकांच्या मागे सारखा तगादा लावल्यानंतर 23 दिवसांत आणखीन 373 कोटींची थकबाकी वसूल करण्यात पालिकेला यश आले. मात्र अद्यापही मालमत्ता करधारकांकडे 931 कोटींची थकबाकी प्रलंबित असून येत्या 25 मे पर्यंत  अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर पालिका कायदेशीर कारवाई करणार आहे. (BMC Property tax collection challenge front of Mumbai Municipal Corporation)

मुंबई महापालिका हद्दीत एकूण मालमत्‍तांची संख्‍या 9 लाख 55 हजार 38 इतकी आहे. त्‍यापैकी 500 चौरस फूट (46.45 चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्‍तांची संख्‍या 3 लाख 56 हजार 652 इतकी आहे. एकंदरीतच 5 लाख 98 हजार 386 मालमत्‍ता कर आकारणी कक्षात येतात.

मुंबई महापालिकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर कर संकलनाचे उद्दिष्ट 4 हजार 500 कोटी रुपये ठेवले आहे. कर निर्धारण व संकलन विभागाने मात्र मालमत्ता कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांना फेब्रुवारी महिन्यात बिल पाठवले होते. मालमत्ता कर भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत अखेरची मुदत होती. महापालिकेला 31 मार्चपर्यंत 3,196 कोटी रुपयांची कर वसुली करता आली. मात्र 1,304 कोटी रुपयांची मालमत्ता कर थकीत राहिला. त्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर भरण्यासाठी 25 मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणारे बडे उद्योजक, प्रसिद्ध कंपन्या, बिल्डर, हॉटेल मालक आदींनी 1 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत 373 कोटींचा कर भरणा केला. आजही अनेकांकडे 931 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे.

येत्या 25 एप्रिलपर्यंत मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी मालमत्ताकर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

24 एप्रिल रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) बॉम्‍बे ऑक्सिजन लिमिटेड – (टी विभाग) – 68 कोटी 88 लाख 1 हजार 778 रुपये
२) ॲरिस्‍टो शेल्‍टर प्रा. लि. (एम/पूर्व विभाग) – 20 कोटी 41 लाख 62 हजार  976 रुपये
३) मेसर्स फोरमोस्‍ट रिअॅलेटर्स प्रा लि.(एच/पूर्व विभाग) – 15 कोटी 75 लाख 74 हजार 207 रुपये
४) श्री साई गृप ऑफ कंपनीज (के/पश्चिम विभाग) – 14 कोटी 22 लाख 80 हजार 874 रुपये
५) गौरव इन्‍वेस्‍टमेंट (जी/दक्षिण विभाग) – 14 कोटी 16 लाख 31 हजार 489 रुपये
६) मेसर्स पुरी कन्‍स्‍ट्रक्‍शन लि. (ए विभाग) – 13 कोटी 83 लाख 91 हजार 744 रुपये
७) स्‍नेहयोगी सहकारी गृहनिर्माण संस्‍था (एच/पश्चिम विभाग) – 13 कोटी 72 लाख 82 हजार 99 रुपये
८) सुमेर कॉर्पोरेशन (एल विभाग) – 13 कोटी 8 लाख 83 हजार 227 रुपये
९) लॅण्‍डमार्क डेव्‍हलपर्स (एफ/दक्षिण विभाग) – 12 कोटी 12 लाख 71 हजार 300 रुपये
१०) श्री साई पवन सहकारी गृहनिर्माण संस्‍था (के/पश्चिम विभाग) – 8 कोटी 73 लाख 33 हजार 111 रुपये

(हेही वाचा: Voting Boycott: 100 टक्के टोलमाफी द्या, अन्यथा मतदान करणार नाही; नागरिकांचा सरकारला इशारा)


Edited By- Prajakta Parab

First Published on: April 24, 2024 9:43 PM
Exit mobile version