मुंबई महानगर पालिकेत २९१ दुय्यम अभियंत्यांची भरती!

मुंबई महानगर पालिकेत २९१ दुय्यम अभियंत्यांची भरती!

महापालिकेतील १३८८ कामगारांच्या भरतीनंतर आता पालिकेत २९१ दुय्यम अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. स्थापत्य (सिव्हिल), यांत्रिकी (मॅकेनिकल) आणि विद्युत (इलेक्ट्रिकल) तसेच वास्तुशास्त्रज्ञ या पदांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून परीक्षा घेण्यास स्थायी समितीने फेब्रुवारी महिन्यातच मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतर या भरती परीक्षेसाठी जाहिरातच देण्यात आली नव्हती. परंतु, आता या परीक्षांच्या जाहिरातींच्या मान्यतेचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला असून, त्यांच्या स्वाक्षरीनंतर या महिन्यातच जाहिरात काढून अर्ज मागवण्यात येणार आहेत.

९ महिन्यांत जागा वाढल्या!

महापालिकेच्या नगर अभियंता विभागामार्फत खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातून दुय्यम अभियंत्यांच्या रिक्त पदांची भरती होणार आहे. त्याची प्रक्रिया पार पाडण्याकरिता महापालिकेने इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आय.बी.पी.एस. या संस्थेची निवड केली आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवून त्यांची परीक्षा घेऊन महापालिकेच्या निकषांनुसार पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी सादर करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. या परीक्षेसाठी संस्थेच्या निवडीस फेब्रुवारी, २०१८मध्ये स्थायी समितीने मान्यता दिली होती. त्या वेळेस अभियंत्यांची २४७ रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव होता. परंतु, या भरती परीक्षेलाच विलंब झाल्याने नवा प्रस्ताव तयार करण्यात आला असून जागांची संख्याही वाढवण्यात आली आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांचा बोनस!


जाहिरातीचा मसुदा तयार

आता एकूण २९१ रिक्तपदांसाठी दुय्यम अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. यामध्ये १९० स्थापत्य, ९२ यांत्रिकी आणि विद्युत तसेच ९ वास्तुशास्त्रज्ञ अशी पदे आहेत. या पदांची भरती प्रक्रिया राबवणे आणि यासाठीची जाहिरात यांचा मसुदा तयार झाला असून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या स्वाक्षरीसाठी तो सादर करण्यात आला आहे.

First Published on: November 8, 2018 2:53 PM
Exit mobile version