मुंबईतील मुस्लीम समाजातील घटकांचीही आता कोरोनाच्या उपचारांना साथ!

मुंबईतील मुस्लीम समाजातील घटकांचीही आता कोरोनाच्या उपचारांना साथ!

कोरोना व्हायरस

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना महापालिकेच्या वतीने आयसोलेशन वॉर्डमध्ये आणि त्या रुग्णांच्या अतिसंपर्कात आलेल्या रुग्णांना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात येते. परंतु या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून महापालिकेला प्रतिसाद दिला जात असला तरी मुस्लिम समाजाकडून योग्यप्रकारे सहकार्य मिळत नसल्याचं चित्र निर्माण झालं होतं. परंतु आता हे चित्र बदलत असून या समाजातील लोकांकडून आता महापालिकेला योग्यप्रकारे सहकार्य लाभताना दिसत आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना तबलिगींना याचा संसर्ग होऊन याचा प्रसार अधिक झाला होता. परंतु सुरुवातीला या समाजातील लोकांकडून महापालिकेला सहकार्य केले जात नसल्याच्या काही घटना घडल्या होत्या. कोरोनाची तपासणी करायला या समाजातील लोक पहिले तयार नसल्याचंही अनेक ठिकाणी घडलं होतं. तसेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकही क्वारंटाईनमध्ये जाण्यास नकार देत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोध करत असल्याचंही समोर आलं होतं. एवढेच नव्हे तर या समाजातील काहींनी उपचार सुरु असताना नर्सेससमोर गैरवर्तनही केले होते. याशिवाय क्वारंटाईनमध्ये असलेल्या या समाजातील लोकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्रासही देण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु, कोरोनाचा संसर्ग अधिकाधिक आपल्याच समाजातील लोकांना होत असून आपण जर सहकार्य न केल्यास आपल्याच लोकांना गमावावे लागते याबाबतची भावना पटल्यानंतर अखेर या समाजातील लोकांचे मतपरिवर्तन झाले आहे. भायखळा, नागपाड्यासह पायधुणी, भेंडीबाजार, बेहराम पाडा, धारावी, कुर्ला, भांडुप, मालाड मालवणी, कांदिवली, गोवंडी आदी भागांमध्ये या समाजाचे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सहायक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला या आजाराला न जुमानणारा या समाजातील एक गट आता कोरोनाची तपासणी करण्यास पुढे येत आहेत. तसेच या कोरोनाग्रस्तांच्या निकट संबंधातील नातेवाईक, मित्र परिवारही अशाप्रकारे तपासणी करून घेत आहे. त्यामुळे या समाजाकडून मिळणारे हे सहकार्य पाहता कोरोनावर मात करण्याचे आव्हान आता सोपे जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

First Published on: April 15, 2020 10:54 PM
Exit mobile version