ऑफलाईन शिक्षणावरही शिक्षकांचे आणि अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष!

ऑफलाईन शिक्षणावरही शिक्षकांचे आणि अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष!

मुंबई महापालिकेच्या अनेक मुलांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. पालक मित्र आणि शिक्षक मित्र संकल्पनेनुसार काही मुलांना ऑफलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे काही वस्त्यांमध्ये जाऊन महापालिकेचे शिक्षक मुलांना शिक्षण देत आहेत. महापालिका शाळांमधील शिक्षक आणि पालक मित्र यांच्याकडून मुलांना घरोघरी जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न होत असून एका बाजुला ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे शिक्षणाला जोडली गेल्यामुळे प्रत्यक्ष शिकवणीचा आनंद मुलांना अनुभवताच येत नाही. मात्र, पालक मित्रांकडून ऑफलाईन शिक्षण योग्य प्रकारे दिले जाते किंवा मुले अभ्यास करतात काय याकडे शिक्षक व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे यासाठी त्यांनी घरोघरी भेटी देण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईतील मुलांना ऑनलाईन तसेच ऑफलाईनद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. ज्या मुलांकडे मोबाईल नाहीत, त्यांना बालक मित्र संकल्पनेनुसार ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात केली. तर पालक मित्र आणि शिक्षक मित्र संकल्पनेनुसार त्यांना ऑफलाईन शिक्षण दिले जात आहे. आर दक्षिण विभागातील कांदिवली गणेश नगर शाळा संकुलातील पालक मित्र ननके शाह, जमालुदिन हासमी, लक्ष्मण सिग, सुरेश जनाला यांनी जोडलेले ऑफलाईन वर्गांना  शाळा निरीक्षक गोविंद पारधी, इमारत प्रमुख कल्पना सिंह, एम पी एस मुख्याध्यापिका वाईरक, ऊर्दुच्या मुख्याध्यापिका आसिया गोदकर, तसेच मराठी शाळेचे प्रमुख किरन पारधी यांनी वस्त्यांमध्ये जाऊन विद्यार्थी व पालक याच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

तसेच हिंदी शाळेच्या शिक्षिका सावित्री यादव तसेच ओमप्रकाश गुप्ता सर यांनी मूलाच्या घरी भेटी देत पालक मित्रांकडून शिक्षणाबाबत केले जाणारे मार्गदर्शनही जाणून घेतले. विशेष म्हणजे महापालिकेच्या शाळांचे शिक्षक व अधिकारी आपल्याला भेटायला घरी आले याचा आनंदच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अधिक दिसून येत होता. एका बाजूला ऑफलाईनद्वारे शिक्षण घेत असतानाच अशाप्रकारे शिक्षक व अधिकारी घरी भेट देऊन पाहणी करत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याबाबतची गोडी अधिक वाढत असल्याचे पालक मित्रांनी सांगितले.

First Published on: November 5, 2020 7:32 PM
Exit mobile version