महापालिकेच्या सायकल ट्रॅक प्रकल्पाचा अंतिम टप्पा

महापालिकेच्या सायकल ट्रॅक प्रकल्पाचा अंतिम टप्पा

सायकल ट्रॅक प्रकल्प

मुंबईत जलवाहिनी लगतच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक बनवून आसपासच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या पहिल्या टप्प्यातील एका किलोमीटर मागे ११ कोटी रुपये खर्च करणारी महापालिका आता दुसऱ्या टप्प्यात एका किलोमीटरसाठी १२.५० कोटी रुपये खर्च करणार आहे. कुर्ला ते धारावी- माहिम आदी परिसरातील जलवाहिनी लगतच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक बनवण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी १२३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

तब्बल १२३ कोटी रुपयांचे कंत्राट 

पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे लोकलची सेवा, तसेच मुंबई मेट्रो, मोनो रेल, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग यासारख्या पर्यायांव्यतिरिक्त मुंबईतील अंतर्गत वाहतूकीला एक नवा पर्याय देण्याठी जलवाहिनीलगत ३९ किमी लांबीच्या सायकल ट्रॅकचे काम चार टप्प्यात हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या चार पैकी पहिल्या दोन टप्प्यांसाठी निविदा काढून कंत्राट कामांना मंजुरी दिल्यानंतर टप्पा २ ब अंतर्गत एल व जी उत्तर विभागातील जलवाहिनी लगत सायकल ट्रॅक बनवण्याच्या कामांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली. टप्पा २ ब अंतर्गत ९.८ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सेवा रस्ता तसेच वृक्षारोपण, उद्यान तसेच अन्य प्रकारच्या कामांसाठी बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी विविध सेवाकरासह १२३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यासाठी ११ कोटी खर्च

पहिल्या टप्प्यात मुलुंड ते अंधेरी (सहार रोड) या १४.१० किलोमीटरच्या पट्ट्यात हे सायकल ट्रॅक उभारण्यासाठी महापालिकेने पी. डी. अर्थमुव्हर्स या कंत्राटदाराची निवड केली. यामध्ये सर्व करांसह १६१ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. पहिल्या टप्प्यातील काम हे चुकीच्या पध्दतीने नागपुरमधील कंपनीला देण्याचा घाट घातला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांचे कंत्राट देण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात एन, एम पश्चिम विभाग, एफ दक्षिण विभाग व एच पूर्व विभागातील मुख्य जलवाहिनींलगत १२ किलोमीटर लांबीचे काम स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीला ९७.२९ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सायकल ट्रॅकच्या एका किलोमीटरसाठी ११ कोटी रुपये मोजले गेले, तर दुसऱ्या टप्प्यात एका किलोमीटरसाठी ८.२५ कोटी रुपये मोजले गेले. तर टप्पा दोन बमधील कामांमध्ये एका किलोमीटरसाठी १२.५० कोटी रुपये मोजले जाणार आहे. मुळात यापूर्वी मंजूर केलेल्या दोन कामांना अद्यापही सुरुवात झालेली नसताना, तिसऱ्या कामाचे निविदा काढत कंत्राटदाराची नेमणूक करत पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे.

हेही वाचा –

चंद्रकातदादांना सुबुद्धी दे रे बाप्पा…

First Published on: September 11, 2019 10:01 AM
Exit mobile version