BMC: कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक यांना महाकाय गर्डरने जोडणार

BMC: कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक यांना महाकाय गर्डरने जोडणार

कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक यांना महाकाय गर्डरने जोडणार

मुंबई: आशिया खंडातील व मुंबईतील पहिल्या कोस्टल रोडचे संपूर्ण काम अंतिम टप्प्यात आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे – वरळी सी लिंक यांना हवामानाचा अचूक अंदाज घेऊन शुक्रवारी पहाटेच्या सुमारास 136 मीटर लांबी, 18 ते 21 मीटर रुंदी, 2 हजार मेट्रीक टन वजन असलेल्या महाकाय गर्डरने जोडण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच मे महिन्यात दुसरा महाकाय गर्डरही सी लिंक आणि कोस्टल रोड यांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोस्टल रोड आणि सी लिंक यावरून वाहतूक जलदगतीने सुरू होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असून वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. (BMC Will connect Coastal Road and Worli Sea Link with giant girder)

दुसरा गर्डरही जवळजवळ 25 हजार मेट्रिक टन टन वजनाचा असणार आहे. तसेच, या दुसऱ्या गर्डरची लांबी 143 मीटर आणि 26 ते 29 मीटर रुंदी असणार आहे. कोस्टल रोडच्या संपूर्ण कामावर तब्बल 14 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र गर्डरद्वारे सी लिंक आणि कोस्टल रोड जोडण्याचे काम फारच आव्हानात्मक व जोखमीचे असणार आहे. शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार गर्डर स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी पाच ते सहा तासांचा अवधी लागणार असून यासाठी महापालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असा कोस्टल रोड प्रकल्प 26 एप्रिल रोजी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. कोस्टल रोड प्रकल्प आणि वांद्रे – वरळी सी लिंक यांना जोडणारा प्रथमच एका महाकाय गर्डरने मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सी लिंकपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 14 हजार कोटी रुपये खर्चून 10.58 किमी लांबीचा प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोड उभारण्यात येत आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका 11 मार्च 2024 पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर आता कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे वरळीकडील टोक जोडण्यात येणार आहे. त्यासाठी महाकाय गर्डर न्हावा येथून कोस्टल रोड येथे कामाच्या ठिकाणी दाखल झाला आहे. 26 एप्रिल रोजी प्रवाहकीय हवामानानुसार हा गर्डर स्थापन करण्यात येणार आहे. हा अडीच हजार मेट्रीक टन वजन असलेल्या बार्जवरून हा गर्डर आणला आहे. यानंतर मे 2024 अखेरपर्यंत उत्तर वाहिनी दुसऱ्या मार्गिकेसाठी आणखीन एक गर्डरची जोडणी करण्यात येणार आहे. हा दुसरा गर्डर सध्या न्हावा बंदरात आहे. शुक्रवारी पहिला गर्डर जोडल्यानंतर दुसरा गर्डर मे महिन्यात आणून नंतर तोही जोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

असा आहे पहिला गर्डर -:

पहिला गर्डर हा वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात येणार आहे. हा गर्डर दोन हजार मेट्रीक टन वजनाचा आहे. तसेच हा गर्डर 136 मीटर लांब आणि 18 ते 21 मीटर रुंद आहे. जॅकचा वापर करून हा गर्डर स्थापन केला जाणार आहे. तसेच, हा गर्डर वांद्रे-वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडच्या नरिमन पॉईंटकडे जाणाऱ्या बाजूला सांधणार आहे.

मे महिन्यात दुसरा गर्डर जोडणार

कोस्टल रोडवरून वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणाऱ्या मार्गावर दुसरा गर्डरही न्हावा येथून मुंबईत कोस्टल रोडच्या कामाच्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. हा दुसरा गर्डर अडीच हजार मेट्रीक टन वजनाचा असणार आहे. तसेच, हा गर्डर 143 मीटर लांब आणि 26 ते 29 मीटर रुंद आहे. हा गर्डर कोस्टल रोड आणि वांद्रे – वरळी सी लिंक असा जोडण्यात येणार आहे. हा गर्डर स्थापन केल्यानंतर कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक पूर्णपणे जोडले जाणार आहेत.

निरनिराळ्या टप्प्यांवर घेतली खबरदारी -:

देशामध्ये प्रथमच समुद्रामध्ये 136 मीटर लांबीचा बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसविण्यात येत आहे. जगात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्याच्या घटना अत्यंत मोजक्याच आहेत. वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोजक्याच सुट्या भागांचे (प्री-फॅब्रिकेटेड) पुलाचे नियोजन व बांधकाम करण्यात आले आहे. ही बांधकामप्रणाली अवलंबत समुद्र व पर्यावरण घटकांना कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. या पुलाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून व दमट वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सी-5 गुणवत्ता असलेले गंजविरोधक रंगकाम केले आहे.

मुंबई किनारी प्रकल्पाविषयी -:

कोस्टल रोड हा 10.58 किलोमीटर लांबीचा आहे. या कोस्टल रोड प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरबदल मार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत. तसेच दक्षिण-उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी 2 किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी 8 मार्गिका आहेत. या बोगद्यांना तब्बल 375 मिमी जाडीचे काँक्रिटचे अस्तर आहे. या बोगद्यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायूविजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर 10 छेद बोगदेदेखील आहेत. तसेच या प्रकल्पातून 70 हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे.

(हेही वाचा: BMC : मुंबई हिवताप मुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नागरी सहभाग गरजेचा; प्रशासनाकडून आवाहन)


Edited By- Prajakta Parab

First Published on: April 25, 2024 10:45 PM
Exit mobile version