मुंबई महापालिकेचा कारभार गेला खड्ड्यात

मुंबई महापालिकेचा कारभार गेला खड्ड्यात

मुंबई : रस्त्यांवर शिल्लक असलेले 358 खड्डे बुजवण्याची शनिवारची डेडलाईन न पाळल्याने महापालिकेचा कारभार ‘डेड’ असल्याचेच सिद्ध झाले आहे.

महापालिकेने 48 तासांत खड्डे बुजवण्याच्या वल्गना केल्या होत्या. शनिवारी रात्रीपर्यंत खड्डे बुजवण्यात पालिकेला अपयश आल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते.खड्डे बुजवण्याची डेडलाईन कंत्राटदारांनीही न पाळल्याने पालिका त्यांच्यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणतेही आकडेवारी व कारणे न देता प्रशासनाने 48 तासांत खड्डे बुजवावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केल्यानंतर प्रशासनाने तसे आश्वासन दिले. 48 तासांत खड्डे बुजवण्यात येतील आणि ते चुकीच्या पद्धतीने बुजववल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर एफआयआर दाखल करू, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सभागृहात दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पालिकेच्या मुख्यालयात रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांची कंत्राटदारांसोबत बैठक झाली. त्यावेळी कंत्राटदारांना 48 तासांची मुदत देण्यात आली होती.

खड्डे भरण्याची डेडलाईन चुकली, खड्डे जैसे थे

महिनाभरात रस्त्यांवर 1032 खड्डे पडले. त्यापैकी 674 खड्डे बुजवण्यात आले. तर 358 खड्डे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला होता. ते बुजवण्याची डेडलाईन कंत्राटदारांना देऊन ती पाळणार्‍यांवर कारवाईचा इशारा रस्ते विभागाचे मुख्य अभियंंता विनोद चिठोरे यांनी दिला होता. मात्र शनिवारी रस्त्यावर खड्डे दिसत होते. खड्ड्यांची संख्या 358 पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत होते.

रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डे पडत असल्याचे पडसाद पालिका सभागृहात उमटले होते. या प्रश्नावर विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले होते. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत खड्डे आणि त्यावर होणार्‍या खर्चाबाबत जाब विचारला होता.

खड्डे भरण्यासाठी 297 टन कोल्डमिक्स

रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी गेल्यावर्षी कोल्डमिक्स हे परदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसल्याने यावर्षी हे मिश्रण बनवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यानुसार ‘कोल्डमिक्स’चे उत्पादन पालिकेच्या वरळीतील ‘अस्फाल्ट प्लान्ट’ मध्येच करण्यात आले. गेल्यावर्षी १७० रुपये किलो दराने ‘कोल्डमिक्स’ ची खरेदी केली होती. मात्र त्याचेे उत्पादन महापालिकने केल्याने ते २८ रुपये प्रतिकिलोने पडले. पालिकेने एकूण 297 टन कोल्डमिक्स तयार केले असून, त्यापैकी 293 टन कोल्डमिक्स खड्डे भरण्यासाठी वापरले असल्याची माहिती मुख्य अभियंता विनोद चिटोरे यांनी दिली.

खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.

– विनोद चिटोरे, मुख्य अभियंता,

रस्ते विभाग

व्हीआयपी रस्त्यांसाठी साडेचार कोटी

डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), सीताराम पाटकर मार्ग, बाबूलनाथ रोड, ऑगस्ट क्रांती मार्ग (केम्स कॉर्नर जंक्शन ते मुकेश चौक) केम्स कॉर्नर जंक्शन, भुलाभाई देसाई मार्ग (वॉर्डन रोड), नेपीयन्सी रोड, बाळ गंगाधर खेर मार्ग, हाजी अली जंक्शन वाळकेश्वर रोड या व्हीआयपी रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, यासाठी ऐन पावसाळ्यात तेथील रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची लगबग पालिका प्रशासनाने चालवली आहे. खड्ड्यासह झेब्रा क्रॉसिंग, स्थळदर्शक फलक, रस्ते दुभाजक, लेन मार्किंग आदी कामे केली जाणार आहेत. भारत कन्स्ट्रक्शनला हे काम दिले आहे. सह-पोलीस आयुक्त (वाहतूक) यांनी सुचविलेल्यानुसार ही कामे केली जात असल्याचे पालिका प्रशासनाने म्हणणे आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कंत्राटदार काळ्या यादीत 

रस्त्याचे काम चुकीच्या पध्दतीने करणार्‍या झोन तीनमधील मनदीप कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला पालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. चुकीच्या पध्दतीने काम करणा-या कंत्राटदारांना यापुढेही काळ्या यादीत टाकले जाणार आहे.

तर शिवसेना-भाजप पालिकेतून हद्दपार

खड्डे न बुजवल्यास शिवसेना व भाजप यांना पालिकेतून हद्दपार व्हावे लागेल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. निरुपम यांनी शनिवारी ‘आओ पॅथहोल गिने’ ही मोहीम सुरू केली. या वेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयाजवळचे खड्डे बुजवले. शहरात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला 2500 टन कोल्डमिक्सची गरज आहे. परंतु, पालिकेने फक्त 40 टन कोल्डमिक्स तयार केले आहे. परिणामी खड्डे बुजवण्यात अडचण येत असल्याचे निरुपम यांनी सांगितले.

खड्ड्यांनी घेतला तरुणाचा बळी, सायन-पनवेल मार्गावर अपघात

सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथेे खड्ड्यांमुळे शुक्रवारी सकाळी एका तरुणाला जीव गमवावा लागला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. सनी विश्वकर्मा (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नेरुळ येथे राहत होता. त्याच्या वडिलांचे तुर्भेमधील जनता मार्केटमध्ये दुकान आहे. तेथे तो गुरुवारी रात्री उलव्यात राहणार्‍या कमलेश यादव (वय 29) या मित्रासोबत आला होता. पहाटे सव्वा दोन वाजता तेे मोटारसायकलने तुर्भे येथून नेरूळमार्गे उलव्याला निघाले. ते सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे आले असता रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये त्यांची मोटारसायकल घसरली. या अपघातात सनीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी कमलेशला नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातामुळे ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सानपाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सानपाडा उड्डाणपुलावर एक जखमी

शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा येथील नवीन उड्डाणपुलावर झालेल्या आणखी एका दुचाकी अपघातात अरुण गिरीराज दुबे (३९) गंभीर जखमी झाला. अरुण स्कूटीवरून बेलापूरला जात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी दुभाजकाला धडकली. दुबेला परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती सानपाडा पोलिसांनी दिली.

First Published on: July 15, 2018 7:32 AM
Exit mobile version