बॉम्बे ब्लड ग्रुपने वाचवले गर्भवतीचे प्राण

बॉम्बे ब्लड ग्रुपने वाचवले गर्भवतीचे प्राण

विक्रम यादव, रक्तदाता

भारतात बॉम्बे ब्लड ग्रुपचे १७९ दाते; जगभरात अवघे २३०

२९ राज्यात तासगावची बाजी

आग्राच्या गर्भवती महिलेला ’बॉम्बे ब्लडग्रुप’ या अत्यंत दुर्मिळ रक्ताची गरज होती. त्यामुळेच आठ महिन्यांची गर्भवती महिला पूनम शर्मा (२५) यांना आणि त्यांच्या गर्भात असणाऱ्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी रविवारी महाराष्ट्रातील दोन रक्तदात्यांनी थेट दिल्ली गाठली. या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगटाचे भारतात १७९ रक्तदाते आहेत आणि जगात फक्त २३० जण आहेत. २९ राज्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवरुन या महिलेसाठी बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्ताची मागणी करण्यात आली होती. पण, तासगावच्या विक्रम यादव यांनी माणुसकी जपत रक्तदानासाठी थेट दिल्ली गाठत रक्तदान केले.

काय आहे बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगट ?
सामान्यत: ए, बी, एबी, ओ पॉझिटीव्ह, निगेटीव्ह असे रक्तगट आढळतात. बॉम्बे ब्लड ग्रुप हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे. ओ पॉझिटीव्ह या रक्तगटात एच फॅक्टर नसतो. त्यामुळे लाखांत दहा जणांमध्ये हा ब्लडग्रुप आढळतो. या ग्रुपचा शोध आधी मुंबईच्या केईएम रुग्णालयात लागला होता. त्यामुळे या रक्तगटाचे नाव बॉम्बे ब्लड ग्रुप ठेवण्यात आले.
पूनम शर्मा या महिलेला बॉम्बे ब्लड ग्रुपची गरज होती. शिवाय, शरीरातील हिमोग्लोबिन ३,८ अंशावर पोहोचले होते. आग्रा येथून थेट जगभरात या ब्लड ग्रुपसाठी विचारणा करण्यात आली होती. हे तासगावच्या बॉम्बे ब्लड ग्रुपचे अध्यक्ष विक्रम यादव यांना समजले. त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता थेट दिल्ली गाठली. तब्बल २ हजार किलोमीटरचा आग्रापर्यंतचा प्रवास करून ’बॉम्बे’ रक्तगट’ असणाऱ्या विक्रम यादव यांनी या महिलेला जीवदान दिले आहे.

अशी राबवली बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी मोहिम
पूनम शर्मांवर आग्रामधील डीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टर, समाजसेवक सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, बॉम्बे ब्लडग्रुप ( +) हा रक्तगट मिळत नव्हता. शेवटी व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेण्यात आली. विविध रक्तदात्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवण्यात आला. रेडियोच्या माध्यमातून मदत मागण्यात आली. पण, सर्व प्रयत्न व्यर्थ गेले होते. पूनमला रक्ताची नितांत गरज असलेला मेसेज २३ जूनला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगावच्या विक्रम यादव यांच्या मोबाईलवर आला. विक्रम यांचा रक्तगटही बॉम्बे ब्लडग्रुप आहे. विक्रम यांनी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश अशा अनेक जिल्ह्यात मदत मागितली. पण, मदत मिळत नव्हती. शेवटी, प्राण वाचवायचे या उद्देशाने विक्रम यांनीच थेट दिल्ली गाठली. विक्रम यांच्यासोबत शिर्डीतील रवींद्रही दिल्लीला गेले.

या रक्तासाठी २९ राज्यातील ५८३ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चौकशी सुरू होती. त्यानंतर आम्हाला हा मेसेज आला होता. पण, रक्तदाताच उपलब्ध होत नव्हता. हे समजताच आम्हीच थेट दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. २३ जूनला आम्हाला रात्री हा मेसेज मिळाला आणि २४ जूनला २ हजार किलोमीटरचा प्रवास करून आग्रा येथे पोहोचलो.
– विक्रम यादव, रक्तदाता

शिवाय, हे माझे ४५ वे रक्तदान आहे. फक्त महाराष्टातच नाही तर जगभरात आम्ही रक्तदान केले आहे. महिला गर्भवती असल्याकारणाने वेळ खूप कमी होता. आम्ही वेळेत पोहचू का ? असा प्रश्न आला. पण, त्या महिलेला रक्तदान केल्यामुळे ती महिला आता वाचू शकली आहे. याचे खूप समाधान वाटते आहे, असेही ’आपलं महानगर’शी बोलताना विक्रम यादव यांनी सांगितले.

First Published on: June 26, 2018 8:08 AM
Exit mobile version