शहरात दोन घटनेत दोघांवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला

शहरात दोन घटनेत दोघांवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला

प्रातिनिधीक फोटो

शहरात दोन घटनेत दोघांवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अंधेरी आणि दादर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माटुंगा आणि डी. एन. नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही भोईवाडा आणि अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरीतील दादाभाई क्रास रोडवरील वृदांवनसमोरील चौकात रफिक शब्बीर शेख या तरुणाचा नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी त्याच्याकडे मल्लिकाअर्जुन भीमप्पा जडवी या 56 वर्षांच्या व्यक्तीने हप्ता मागितला होता. याच कारणावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता.

रविवारी सकाळी साडेदहा वाजता मल्लिकाअर्जुनने रफिककडे हप्त्याची मागणी केली. यावेळी रागाच्या भरात त्याने नारळ सोलण्याच्या चाकूनेच मल्लिकाअर्जुनवर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच डी. एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मल्लिकाअर्जुनला कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रफिकविरुद्ध 307, 504, 506 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर सोमवारी त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरी घटना दादर येथील स्टेशन रोड, शुभम हॉटेलजवळ घडली. नरेश प्रेमराज शर्मा या 23 वर्षांच्या तरुणावर त्याच्या परिचित तरुणाने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात नरेश हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासात पूर्ववैमस्नातून हा हल्ला झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्लेखोर आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: March 26, 2019 4:08 AM
Exit mobile version