पब्जी गेमसाठी त्याने सोडले घर

पब्जी गेमसाठी त्याने सोडले घर

'पबजी' गेम

शाळेकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पॉकेमॉन गो, ब्ल्यू व्हेल या गेम्सनंतर आता पब्जी गेमने वेड लावले आहे. या गेमसाठी एका तरुणाने चक्क घर सोडले. भिवंडी शहरातील मानसरोवर येथे ही घटना घडली आहे. मानसरोवर भागातील लेकव्ह्यू या इमारतीत राहणा-या अकरावीमध्ये शिक्षणा-या विद्यार्थ्याने घर सोडले. मयुर राजेंद्र गुळुंजकर असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मयुरच्या अपरहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मयुरचा शोध घेत आहेत.

आई ओरडल्याने सोडले घर

मयुर मोबाईलवर सतत पपजी गेम खेळायचा त्यामुळे त्याची आई त्याला ओरडायची. आई सतत ओरडायची त्यामुळे मयुर घरातून गाडी आणि मोबाईल घेऊन निघून गेला. मयुरच्या आईने त्याच्या बहिणीला भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर त्याला आणायला पाठवले. मात्र मयुर नेहमीच्या ठिकाणी बाईक लावून निघून गेला होता. त्याच्या बहिणीने त्याला फोन केला असता मयुरच्या गाडीवरच मोबाईल वाजत होता. मयुर बाईकच्या हॅण्डलजवळ असलेल्या जागेत गाडीची चावी आणि मोबाईल सोडून गेला होता. त्याच्या बहिणीने याबाबत घरच्यांना माहिती सांगितली. त्यानंतर घाबरलेल्या मयुरच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांकडून तपास सुरु

मयूरच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नारपोली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मयूरचे वय सज्ञान नसल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मयुरचा शोध सुरु आहे. मयूरच्या कुटुंबियांकडून त्याच्याबद्दलची सर्व माहिती पोलिसांनी घेतली असून त्यामाध्यमातून पोलीस मयूरचा शोध घेत आहेत.

First Published on: April 1, 2019 6:40 PM
Exit mobile version