केईएममध्ये लवकर होणार ब्रेन स्ट्रोकवर उपचार

केईएममध्ये लवकर होणार ब्रेन स्ट्रोकवर उपचार

केईएम रुग्णालयातील उपचार करणारी मशीन

ज्या वेळेस कुटुंबातील एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक म्हणजेच मेंदूत आघात होतो, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मागे संपूर्ण कुटुंबाला धावावं लागतं. त्यातही जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. उपचाराला उशीर झाला तर कायमच अपंगत्व येऊ शकतं आणि त्या व्यक्तीचा भार कुटुंबियांवर पडतो. त्यामुळे, या विकाराबाबतची लक्षणे समजून तात्काळ उपचारांसाठी धाव घेणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालयात ब्रेन स्ट्रोकच्या आजारासाठी पक्षाघात विभाग सुरू करण्यात आला आहे. ‘गोल्डन अवर’नंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी ‘बायप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन एँजिओग्राफी ‘ ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करुन देण्यात आली. या विभागाचं उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या मशीनची किंमत ७ कोटी एवढी आहे.

”मेंदूतील रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासाठी स्टेंटचा वापर करुन मेंदूच्या धमनीतून गुठळी काढण्याची एक पद्धत आहे. ही पद्धती त्यांच्यासाठी उपयोगी आहे ज्यांना ड्रग थेरपी उपलब्ध नाही किंवा ज्यांना ड्रग थेरपीने फायदा झालेला नाही”, असं न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

“ही मशीन रुग्णालयात आणण्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे ते म्हणजे ब्रेनस्ट्रोकच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास ७ ते ८ लाख होतो पण, इथे कमीतकमी खर्चात शस्त्रक्रिया करणं हा आमचा मानस आहे. शिवाय, आता २४ तासाच्या आत उपचार करणे शक्य झाले असले तरी रुग्णांनी लक्षणे आढळल्यास तात्काळ दाखल होणं गरजेचं आहे. “- डॉ. संगीता रावत, न्यूरोलॉजी विभाग प्रमुख , केईएम रुग्णालय

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला मोठा झटका किंवा रक्ताची मोठी गाठ असल्यास ती विरघळणे अवघड असते. त्यामुळे या अत्याधुनिक मशीनद्वारे उशिरा येणाऱ्या रुग्णांच्याबाबतीत चोवीस तासांपर्यंत एँजिओग्राफीमार्फत रक्ताची मोठी गुठळी काढता येणं शक्य होणार आहे.

केईएम रुग्णालयात दरदिवशी पक्षाघाताचे दिवसाला जवळपास ५ ते ६ रुग्ण दाखल होतात. असे महिन्याला किमान १५० रुग्ण पक्षाघाताचे आढळतात. तर, गेल्या २ वर्षात केईएम रुग्णालयात सरासरी ३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी ५४ रुग्णांनी इंजेक्शन घेऊन पक्षाघातावर मात केली असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी दिली आहे.

“या मशीनमुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारा जास्तीचा वेळ आता कमी होणार आहे. या मशीनमधून एक शस्त्रक्रिया जवळपास २५ मिनिटांत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे या मशीनचा खूप मोठा फायदा होणार आहे. ही मशीन रुग्णालयात यावी हे माझं १० वर्षांपासूनचं स्वप्न होतं. जे आता पूर्ण झालं आहे. दिवसाला २० शस्त्रक्रिया करणं सहज शक्य होऊ शकेल.” डॉ. नितीन डांगे, न्यूरोसर्जन ,प्राध्यापक, केईएम

केईएम रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जगात दरवर्षी ६० लाख रुग्णांचा ब्रेनस्ट्रोक मुळे मृत्यू होतो. जगामध्ये दर ६ सेकंदाला ब्रेनस्ट्रोकमुळे एका रुग्णाचा मृत्यू होतो. प्रत्येक ६ व्यक्तींमध्ये एकाला ब्रेनस्ट्रोक होतो. भारतात एका वर्षांमध्ये १४ ते १६ लाख नवीन रुग्णांना ब्रेनस्ट्रोक होतो. प्रत्येक १ लाख मृत्यूंमध्ये २०० रुग्णांचा मृत्यू ब्रेनस्ट्रोकमुळे होतो. तर, मृत्यूच्या विविध कारणांमध्ये ब्रेनस्ट्रोक हे दुसरे कारण आहे. त्यामुळे जेवढा जास्त उशीर, तेवढा मेंदूचा जास्त भाग निकामी होतो. त्यामुळे जनजागृतीची जास्त आवश्यकता आहे. कारण, रुग्णाला लवकरात लवकर दाखल करणे गरजेचं असल्याचं मत डॉक्टर व्यक्त करतात.

पक्षाघाताचे प्रकार 

इश्चेमिक स्ट्रोक (ब्लॉकजेस) – ८७ टक्के हा मेंदूला अचानक रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे किंवा अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो. साडेचार तासांमध्ये इंजेक्शनद्वारे उपचार केले जातात. ब्रेनस्ट्रोक झाल्यानंतर पहिल्या साडेचार तासांत रुग्ण दाखल झाल्यास एका विशेष इंजेक्शनद्वारे रक्ताची गुठळी विरघळवता येते. इंजेक्शन दिल्यामुळे गुठळी विरघळल्यानंतर काही मिनिटे किंवा तासांतच रुग्णामध्ये सुधारणा होते. त्यानंतर पुढील २४ तास रुग्णावर लक्ष ठेवावं लागतं. कारण, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

हिमरेजिक स्ट्रोक (रक्तस्त्राव ) – १३ टक्के हा मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे होतो.

ब्रेनस्ट्रोकची लक्षणे 

चेहऱ्यावर वाकडेपणा येणे
हातांना – पायांना अशक्तपणा येणे
बोलताना अडखळायला होते
अचानक दिसायला कमी होते
चक्कर येणे किंवा चालताना तोल जाणे

 

First Published on: October 10, 2018 8:05 PM
Exit mobile version