अंधेरीनंतर आता ग्रँट रोड पुलाला तडे

अंधेरीनंतर आता ग्रँट रोड पुलाला तडे

केनेडी पुलाला तडे

अंधेरीचा गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असताना ग्रँट रोड स्टेशनजवळील पुलाला तडे गेले आहेत. ग्रँट रोड स्टेशनला पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पूलाला हे तडे गेले. या पुलाच्या दुरवस्थेमुळे आता मुंबई आणि उपनगरातल्या पुलांच्या डागडुजीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. लोकप्रतिनिधी आणि महापालिका लक्ष देत नसल्याचा संताप देखील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

केनेडी पुलावरुन वाहतूक वळवली

ग्रँट रोड स्टेशनजवळचा हा पूल पूर्व-पश्चिम जोडणारा आहे.  हा पूल नाना चौकापासून ते एमएस अली रोड असा आहे. या पुलावर वाहनांची वर्दळ असते. मंगळवारी सकाळी अंधेरीचा गोखले पूलाचा काही भाग कोसळल्यानंतर बुधवारी सकाळी या पुलाला तडे गेल्याची माहिती समोर आली. पुलाला तडे गेल्याचे लक्षात आल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला याची कल्पना दिली. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांच्या मदत्तीने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.दरम्यान  प्रवाशांना अडचणी येऊ नये म्हणून ही वाहतूक केनेडी पुलावरुन वळवण्यात आली आहे.

केनेडी पुलाला गेलेले तडे

डांबरीकरण करणार

पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला असून या पुलाच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत, पण पुलाच्या खालील बाजूस अशा भेगा नाही. त्यामुळे या पुलाला धोका नाही, असे सांगण्यात आले आहे. शिवाय  रेल्वे आणि महापालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी यांनी या पुलाची पाहणी केली. भेगा असलेल्या ठिकाणी डांबरीकरण करून तो भाग व्यवस्थित केला जाईल, असे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत अनेक पूलांची जीर्णावस्था

चर्नी रोड येथील ठाकूरद्वार पुलाची दुरवस्था झाली हे अनेकदा सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. अनेक प्रवाशांना या पुलामुळे दुखापत झाली होती. गेल्यावर्षी हा पूल अखेर पडला. इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील अमरमहल पूल देखील अतिवजनामुळे धोकादायक झाला होता.त्यामुळे तातडीने या पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. या पुलाला वेगळ्या पद्धतीने टेकू लावून हा पूल सुरु करण्यात आला.

 

First Published on: July 4, 2018 12:36 PM
Exit mobile version