ठाण्यात धाकट्या भावानंच मोठ्या भावाची केली हत्या!

ठाण्यात धाकट्या भावानंच मोठ्या भावाची केली हत्या!

प्रातिनिधीक फोटो

व्यवसायिक वादातून मोठ्या भावाची हत्या करून अपघाती मृत्यु असल्याचा बनाव करणाऱ्या लहान भावाला शुक्रवारी रात्री ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. २ जुलै रोजी दुपारी ठाण्यातील कोपरी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी लहान भावाला रात्री उशिरा अटक केली आहे.

महेश चावला (४८) असे मृत भावाचे नाव असून अनिल चावला (४५) हा त्याचा लहान भाऊ आहे. ठाणे पूर्व कोपरी गावदेवी मंदिर परिसरात राहणाऱ्या भावांचे घराजवळच वडिलोपार्जित किराणा मालाचे रतन स्टोर्स नावाचे दुकान आहे. हे दुकान दोघे भाऊ भागीदारीत चालवत होते. मात्र मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये भागीदारीवरून वाद सुरू होता अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी दुपारी हा वाद विकोपाला गेला आणि दुकानातच दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून अनिलने भाऊ महेशच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. वर्मी घाव बसल्यामुळे महेशचा जागीच मृत्यू झाला.

दुकान बंद असल्यामुळे दुकानात नोकर मंडळी नसल्याचा फायदा घेऊन अनिलने महेश हा दुकानातील शिडीवरून पाय घसरून पडून त्याचा मृत्यु झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांना या घटनेचा संशय येताच कोपरी पोलिसांनी शुक्रवारी अनिलला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी ‘आपलं महानगर-माय महानगर’शी बोलताना दिली.

शुक्रवारी रात्री उशिरा मोठ्या भावाच्या हत्येप्रकरणी अनिल चावला याला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.

First Published on: July 4, 2020 1:21 PM
Exit mobile version