अविनाश भोसले ३० मे पर्यंत नजरकैदेत, सीबीआय कोर्टाचा आदेश

अविनाश भोसले ३० मे पर्यंत नजरकैदेत, सीबीआय कोर्टाचा आदेश

डीएचएफएल (DHFL) प्रकरणात तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (avinash bhosale)  यांना सीबीआयने (CBI) गुरूवारी अटक केली. शुक्रवारी त्यांना सीबीआय कोर्टात (cbi court) हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश शिंगाडे यांनी अविनाश भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले.

वरळीतील घरी नजरकैदेत

सीबीआयने  डीएचएफएल (DHFL) प्रकरणात अविनाश भोसले त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर गुरूवारी त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांना वरळीतील घरी नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. त्यांचे वकील आणि कुटुंबातील एकच व्यक्तीला त्यांना भेटण्याची परवानगी आहे. त्यांना ३० मे ला कोर्टासमोर पुन्हा हजर करण्यात येणार आहे.

४० कोटींची संपत्ती जप्त

यापूर्वी देखील ईडीने फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. परदेशात त्यांनी जी गुंतवणूक केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. जून २०२१ मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

अविनाश भोसले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांची अविनाश भोसले यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. पुणे आणि मुंबई बांधकाम उद्योगात अविनाश भोसले यांचे मोठे नाव आहे.

First Published on: May 27, 2022 9:20 PM
Exit mobile version