भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली

धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथे तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिलानी इमारत असे या धोकादायक इमारतीचे नाव असून सुमारे 40 कुटुंब या इमारतीत राहत होती. मात्र, दोन भागांमध्ये असलेल्या या इमारतीच्या पश्चिमेकडील 24 सदनिकांचा एक भाग कोसळला आहे. त्यामुळे अनेक जण इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. इमारत मालक सय्यद अहमद जिलानी यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली

घटनास्थळी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी धाव घेत तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. फातमा जुबेर बबू (2 वर्षे मुलगी), फातमा जुबेर कुरेशी (8 वर्षे मुलगी), उजेब जुबेर – (6 वर्षे मुलगा), असका म. आबीद अन्सारी- (14 वर्षे मुलगी), अन्सारी दानिश म. अलिद अंसारी (12 वर्षे मुलगा) सिराज अ. अहमद शेख (28 वर्षे पुरुष), जुबेर कुरेशी (30 वर्षे पुरुष), कौसर शेख (27 वर्षे महिला) व इतर असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

तर अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (18 वर्षे पुरुष), मोमीन शमिउहा शेख (45 वर्ष पुरुष), कौंसर सीराज शेख (27 वर्षे – महिला) रुकसार जुबेर शेख- (25 वर्षे महिला), आवेश सरोजुद्दीन अन्सारी (22 वर्षे पुरुष), जुलैखा म. अली. शेख (52 वर्षे महिला), उमेद जुबेर कुरेशी (4 वर्षे मुलगा) व इतर अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

ही इमारत धोकादायक ठरवून या इमारतीला नोटीस देखील दिली होती. घटनास्थळी अग्निशमन दल, ठाणे येथील टीडीआरएफ व एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून सध्या याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 19 जखमींना बचावकार्य पथकाने ढिगार्‍याखालून बाहेर काढले असून अजूनही अनेक लोक ढिगार्‍याखाली अडकले असून बचावकार्य सुरू आहे.

घटनास्थळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली असून दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रुपये मदत व जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. तर घटनास्थळी राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ,भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांच्यासह अनेक राजकीय पुढार्‍यांनी भेट दिली आहे.

मालकावर गुन्हा दाखल
भिवंडी कामतघर या ठिकाणी सोमवारी पहाटेच्या सुमारास ‘पटेल कंपाऊंड’ ही तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला. तसेच २२ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इमारतीचे मालक सय्यद अहमद जिलानी (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला असून त्यात ४ लहान मुलांचा तसेच ६ महिलांचा समावेश आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडून पटेल कंपाऊंड ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. दोन वेळा या इमारतीला रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, इमारतीचे मालक सय्यद जिलानी यांनी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले होते,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

First Published on: September 22, 2020 4:22 PM
Exit mobile version