ड्रग्जची विदेशात निर्यात; राजकोटच्या व्यावसायिकाला बेड्या

ड्रग्जची विदेशात निर्यात; राजकोटच्या व्यावसायिकाला बेड्या

राजकोटच्या व्यावसायिकाला बेड्या

भारतासह विदेशात बंदी असलेल्या ड्रग्जची विदेशात बोगस दस्तावेजच्या आधारे निर्यात केल्याप्रकरणी राजकोटच्या एका व्यावसायिकाला गुरुवारी आझाद मैदान युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दीपक नटवरलाल मेहता असे या ५९ वर्षीय आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

१ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

यापूर्वी याच गुन्ह्यांत सलीम इस्माईल डोला, चंद्रामणी मातामणी तिवारी, संदीप इंद्रजीत तिवारी आणि धनशाम रामराज सरोज अशा चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या चौघांकडून पोलिसांनी १०० किलो वजनाचे फेण्टानीन नावाच्या ड्रग्जसह एक कार आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकी जप्त केली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे १ हजार कोटी असल्याचे बोलले जाते. थर्स्टी फर्स्टनिमित्त शहरातील विविध हॉटेल, पब तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये काही टोळ्या ड्रग्ज सप्लाय करण्याच्या तयारीत आहेत, भारतासह विदेशात बंदी असलेल्या फेण्टानील नावाचे ड्रग्जचा मुंबई शहरात मोठा साठा आला असून हा साठा काही पार्ट्यांमध्ये पाठविला जाणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर प्रशांत मोरे, सचिन कदम, कलाल, पांगम, आगव, चव्हाण, भावसर, केदार यांनी विलेपार्ले येथील सर्व्हिस रोडवरील एअरपोर्ट मार्बल मार्केटजवळील सुभाष नगर व शास्त्रीनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून चारजणांच्या एका टोळीला कार आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकीसह अटक केली होती.

हेही वाचा – पावसामुळे कामगारांचा बुडालेला १ जुलै पालिका ‘फुल्ल डे’ भरणार!

ड्रग्जची मेक्सिकोत होणार होती निर्यात

कारसहीत दुचाकीची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना १०० किलोचा फेण्टानीन नावाचे ड्रग्ज जप्त सापडले होते. जप्त केमिकल अतिघातक ड्रग्ज म्हणून परिचित आहे. या ड्रग्जची बोगस कागदपत्रांच्या आधारे मेक्सिको देशात निर्यात होणार होती. या केमिकलपासून आंतरराष्ट्रीय मूल्याप्रमाणे ६ हजार ९०० कोटी रुपयांचे टॅबलेट बनविण्यात आले असते. त्यांच्या तपासात ते केमिकल गुजरातच्या राजकोट, कोठडा सांघानीच्या हरमताला इंडस्ट्रियलमधील सॅम फाईन ओ केमिकल लिमिटेड या कंपनीत बनविण्यात आले होते. या कंपनीचा संचालक दीपक मेहता असून त्याच्यासह इतर संचालकांनी अशाच प्रकारे यापूर्वी ४०० किलो केमिकल बेकायदेशीर विदेशात पाठविल्याचे उघडकीस आले होते. इटलीच्या एका कंपनीत ते केमिकल पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यांत दीपक मेहता याचा सहभाग उघडकीस येताच त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलीस निरीक्षक संतोष भालेकर हे चौकशी करीत आहेत. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

First Published on: July 12, 2019 9:40 PM
Exit mobile version